Pahalgam Attack | पहलगाम हल्ल्याआधी मिळाली होती गुप्त माहिती, करण्यात आले होते अलर्ट; अधिकाऱ्याची माहिती

Pahalgam Terror Attack |

Pahalgam Terror Attack | काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. आता या हल्ल्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. या हल्ल्याबाबत आधीच इशारा सुरक्षा यंत्रणांना देण्यात आला होता, असा खळबळजनक दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

श्रीनगरमधील एका हॉटेलवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा मिळाल्यानंतर डल लेक आणि झबरवान पर्वताजवळ सुरक्षा वाढवण्यात आली होती. याबाबत इंडियन एक्सप्रेसने वृत्त दिली आहे.

हल्ल्याच्या इशाऱ्यानंतरपोलीस महासंचालकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाच्या 10–15 दिवस आधीच काश्मीरमध्ये तळ ठोकला होता. दाचीगाम, निशात आणि अन्य भागांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली होती, मात्र त्यात कोणताही ठोस पुरावा सापडला नाही, असे सूत्रांनी सांगितले. मिळालेला गुप्त इशारा अचूक नसल्यामुळे त्याकडे विशेष लक्ष दिलं गेलं नाही.

अधिकाऱ्याने सांगितले, “सुरक्षा यंत्रणांना हल्ल्याचा अंदाज होता. श्रीनगरच्या बाहेरील हॉटेलवर हल्ला होऊ शकतो, असे त्यांना वाटले होते, कारण बहुतेक नागरिकांची हत्या दक्षिण काश्मीरमध्ये झाली आहे.” त्यामुळे पहलगाम हल्ल्याच्या 10-15 दिवस आधी दाचीगाम, निशात आणि आसपासच्या परिसरात शोध मोहीम चालवण्यात आली, पण त्यात काहीही निष्पन्न झाले नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले.

हल्ल्यादरम्यान 4 दहशतवाद्यांनी योजना राबवली, यापैकी 2 स्थानिक तर 2 पाकिस्तानातून (Pakistani terrorists) आल्याचा संशय आहे. स्थानिक दहशतवाद्यांनी आधी पर्यटकांमध्ये मिसळून त्यांना फूड कोर्ट परिसरात एकत्र केलं आणि त्यानंतर इतर दोन दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

हल्ल्यात वापरली गेली अत्याधुनिक शस्त्रास्त्रं

दहशतवाद्यांकडून वापरण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये स्नायपर रायफल्स, M-सीरिज रायफल्स (advanced weapons) आणि शस्त्रभेदी गोळ्या आढळल्या आहेत. या शस्त्रांचा संबंध अफगाणिस्तानातील नाटो सैन्याशी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली.जम्मू-काश्मीर विधानसभेचे विशेष सत्र बोलावण्यात आले असून, 26 मृतांची यादी प्रशासनाकडून मागवण्यात आली आहे. केंद्र सरकारकडूनही या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे सांगण्यात आले आहे.