Kohinoor Diamond | कोहिनूर हिरा भारताला कधी परत मिळणार? ब्रिटिश मंत्र्यांनी दिलं ‘हे’ उत्तर

Kohinoor Diamond

Kohinoor Diamond | कोहिनूर हिऱ्यासारख्या ऐतिहासिक कलाकृतींच्या सामायिक वापरासाठी आणि लाभासाठी ब्रिटन भारतासोबत चर्चा करत असल्याची माहिती ब्रिटनच्या सांस्कृतिक, माध्यम आणि क्रीडा मंत्री लिसा नॅन्डी (Lisa Nandy) यांनी दिली आहे. सध्या लिसा या भारताच्या दौऱ्यावर आहेत.

105.6 कॅरेटचा कोहिनूर हिरा (Kohinoor Diamond) जगातील सर्वात मोठ्या कट केलेल्या हिऱ्यांपैकी एक आहे. पंजाब ताब्यात घेतल्यानंतर महाराजा रणजित सिंह यांच्या खजिन्यातून हा हिरा ईस्ट इंडिया कंपनीच्या हाती लागा व नंतर तो राणी व्हिक्टोरियाला सादर करण्यात आला होता. हा हिरा आजही ब्रिटिश वसाहतवादी लूट आणि साम्राज्यवाद यांचे प्रतीक मानला जातो.

लिसा यांनी माहिती देताना सांगितले की, “यूके आणि भारतातील लोकांना ऐतिहासिक सांस्कृतिक कलाकृतींचा लाभ घेता यावा आणि त्या पाहता याव्यात यासाठी दोन्ही देशात बऱ्याच दिवसांपासून यावर चर्चा सुरू आहे. मी माझ्या समकक्ष नेत्यांशी यावर चर्चा केली आहे.” ब्रिटनचे भारतासोबतचे संबंध “खूप जुने” असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांच्या या दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एका नवीन सांस्कृतिक सहकार्य करारावर स्वाक्षरी करण्यात आल्याची माहिती त्यांनी किली.

त्या म्हणाल्या, ““चित्रपट, फॅशन, संगीत, गेमिंग अशा सर्जनशील क्षेत्रांमध्ये भारत आणि ब्रिटन उत्कृष्ट काम करत आहेत. संयुक्त प्रदर्शनांद्वारे आणि संग्रहालयांतर्गत सहकार्याद्वारे दोन्ही देश लाभ घेऊ शकतात. आमचे सायन्स म्युझियम्स ग्रुप येथील नॅशनल म्युझियम सायन्स म्युझियम्स ग्रुपसोबत संयुक्त सहकार्य, संयुक्त प्रदर्शन आणि विविध वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी काम करत आहे, जेणेकरून भारत आणि यूकेमधील लोकांना त्याचा लाभ घेता येईल. आम्हाला वाटते की इतर सर्व सर्जनशील उद्योगांमध्येही अधिक जवळून सहकार्य करण्याचा हा एक चांगला मार्ग आहे.”

दरम्यान त्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आणि म्हटले की, ब्रिटन दहशतवादाविरुद्ध भारताच्या पाठीशी उभा आहे.