Donald Trump | हॉलिवूड अडचणीत? ट्रम्प यांचा मोठा निर्णय, परदेशी चित्रपटांवर 100 टक्के कर

Donald Trump Tariff on Foreign Films

Donald Trump Tariff on Foreign Films | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पुन्हा एकदा टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी परदेशातून आयात करण्यात येणाऱ्या वस्तूंवर प्रचंड टॅरिफ लावण्याची घोषणा केली होती. आता त्यांनी परदेशात तयार होणाऱ्या चित्रपटांवर 100टक्के कर (Tariff on Foreign Films) लावण्याची घोषणा केली. अमेरिकेतील चित्रपट उद्योग प्रचंड नुकसानीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

“इतर देश आमच्या चित्रपट निर्मात्यांना आणि स्टुडिओजना अमेरिकेतून दूर नेण्यासाठी अनेक प्रकारची प्रोत्साहनं देत आहेत. हॉलिवूड (Hollywood) आणि अमेरिकेतील इतर अनेक भाग उद्ध्वस्त होत आहेत. हा इतर राष्ट्रांचा एकत्रित प्रयत्न आहे आणि म्हणूनच, हा राष्ट्रीय सुरक्षेचा धोका आहे,” असे त्यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले.

ट्रम्प पुढे म्हणाले, “इतर गोष्टींव्यतिरिक्त हा संदेश आणि प्रचार आहे. म्हणून, मी वाणिज्य विभाग आणि युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्हला तात्काळ अशा सर्व चित्रपटांवर १००% कर लावण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे अधिकार देत आहे, जे परदेशात तयार होऊन आपल्या देशात येत आहेत. आम्हाला अमेरिकेत बनलेले चित्रपट पुन्हा हवे आहेत!”  

अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुट्निक यांनी X (ट्विटर) वर ‘आम्ही यावर काम करत आहोत’ असे म्हटले आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय चीनने अमेरिकेतील चित्रपटांची आयात काही प्रमाणात कमी करण्याची घोषणा केल्यानंतर जवळपास एका महिन्याने आला आहे. जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध सुरू असताना चीनने हा निर्णय घेतला होता.

10 एप्रिल रोजी चीनच्या चित्रपट प्रशासनाने एका निवेदनात म्हटले होते की, “अमेरिकन सरकारने चीनवर लादलेल्या अन्यायकारक करांमुळे देशातील प्रेक्षकांची अमेरिकन चित्रपटांबद्दलची अनुकूल भावना आणखी कमी होईल.” यापूर्वी ट्रम्प यांनी चिनी वस्तूंवरील कर 125 टक्क्यांपर्यंत वाढवला होता.

जानेवारीमध्ये व्हाईट हाऊसमध्ये (White House) परतल्यानंतर ट्रम्प यांनी चीनसोबत व्यापार युद्ध सुरू केले आहे आणि अनेक देशांवर जागतिक कर लादले आहेत, ज्यामुळे बाजारपेठेत खळबळ उडाली आहे. मात्र, नंतर त्यांनी चीन वगळता, त्यांनी जुलैपर्यंत अनेक देशांवर लादलेले व्यापक कर स्थगित करण्याची घोषणा केली आहे.