राफेलला लिंबू-मिरची! पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस नेत्याचा केंद्र सरकारला उपरोधिक टोला, भाजपने दिले प्रत्युत्तर

Ajay Rai

Ajay Rai Criticized Modi Gov | उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय (Ajay Rai) यांनी जम्मू-काश्मीरमधीलपहलगाम (Pahalgam Terror Attack) येथील भीषण दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारवर उपरोधिक टीका केली आहे. राय यांनी खेळण्यातील राफेल विमानाला लिंबू-मिरची लावून मोदी सरकार (Modi Government) निष्क्रिय असल्याचा आरोप केला. यावरून वाद निर्माण झाला आहे.

पत्रकार परिषदेत खेळण्यातील विमान दाखवत राय म्हणाले, “देशात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत आणि लोक यामुळे त्रस्त आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपल्या तरुणांनी जीव गमावला.” ते पुढे म्हणाले, “पण हे सरकार, जे खूप मोठ्या गप्पा मारते, दहशतवाद्यांना चिरडून टाकू असे म्हणते – त्यांनी राफेल आणले, पण ते हँगरमध्ये लिंबू आणि मिरच्या लावून उभे आहेत. दहशतवाद्यांवर, त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाई कधी करणार?”

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2019 मध्ये फ्रान्समध्ये केलेल्या राफेलच्या ‘शस्त्र पूजे’चा संदर्भ देत, राय यांनी टीका केली. या टीकेमुळे संतप्त झालेल्या भाजपने राय यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. अनेक नेत्यांनी काँग्रेसवर सशस्त्र दलांचे मनोधैर्य खच्ची करण्याचा आरोप केला.

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी राय यांच्यावर निशाणा सोशल मीडियावर लिहिले की, “अजय राय यांना पाहा, हे पाकिस्तानधार्जिण्या काँग्रेस पक्षाचे यूपी अध्यक्ष आहेत, जे पाकिस्तानी वृत्तपत्रे आणि वाहिन्यांमध्ये बातम्या देत आहेत. मोदींच्या विरोधात सैन्याचे मनोधैर्य खच्ची करण्याच्या काँग्रेस पक्षाच्या षड्यंत्राला समजून घ्या.” भाजपच्या इतर नेत्यांकडून देखील त्यांच्यावर सडकून टीका करण्यात आली.

मात्र,या टीकेला न जुमानता राय यांनी आपल्या विधानावर ठाम असल्याचे म्हटले आहे. “दहशतवाद्यांवर कारवाई कधी होणार, हे देशाला जाणून घ्यायचे आहे. राजनाथ सिंह यांनी राफेलवर लिंबू-मिरची लावली होती. राजनाथ सिंह यांनी जे केले तेच मी म्हटले. लिंबू-मिरची कधी काढली जाईल आणि कारवाई कधी केली जाईल, हे आम्हाला जाणून घ्यायचे आहे.”, असे ते म्हणाले. मात्र, त्यांच्या या विधानावरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळाले.