Rohit Sharma Retirement | रोहित शर्माने (Rohit Sharma) कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. आता भारतीय संघाला इंग्लंड दौऱ्याआधी नवीन कर्णधार मिळणार आहे. इंग्लंडमध्ये भारताची पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून हेडिंग्ले येथे सुरू होणार आहे.
भारताने गेल्या वर्षी रोहितच्या नेतृत्वाखाली टी20 विश्वचषक जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर त्याने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून (T20Is) निवृत्ती घेत असल्याची गोषणा केली होती. आता त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तसेच, एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.
रोहितने निवृत्तीची घोषणा करत सोशल मीडियावर लिहिले की, “सर्वांना नमस्कार, मला फक्त हे सांगायचे आहे की मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. पांढऱ्या जर्सीमध्ये माझ्या देशाचे प्रतिनिधित्व करणे हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान होता. गेल्या काही वर्षांपासून दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद. मी एकदिवसीय क्रिकेटमध्येभारताचे प्रतिनिधित्व करत राहीन.”
रोहितने 67 कसोटी सामन्यांमध्ये 40.57 च्या सरासरीने 4301 धावा केल्या आहेत,.त्याने आपल्या कारकिर्दीत 12 शतके आणि 18 अर्धशतके झळकावली आहेत, ज्यात ऑक्टोबर 2019 मध्ये रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेल्या 212 धावांच्या सर्वोत्तम खेळीचा समावेश आहे.
भारताचे माजी अष्टपैलू खेळाडूआणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी रोहितच्या निवृत्तीवर म्हणाले की, “रोहित शर्माचा भारतीय क्रिकेटवरील प्रभाव केवळ विक्रम आणि आकडेवारीच्या पलीकडे आहे. त्याने एक खेळाडू आणि कर्णधार म्हणून संघात विश्वासाची भावना आणली. दबावाखाली शांत राहण्याची आणि नेहमी संघाच्या गरजांना स्वतःच्या गरजांपेक्षा जास्त महत्त्व देण्याची त्याची क्षमता त्याला खऱ्या अर्थाने एक खास खेळाडू बनवते. रोहितसारखी व्यक्ती भारतीय क्रिकेटला मिळाली हे भाग्य आहे.
दरम्यान, रोहितचा हा निर्णय बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या घरच्या मालिकेतील खराब कामगिरीनंतर आणि त्यानंतरऑस्ट्रेलियाच्या निराशाजनक दौऱ्यानंतर आला आहे. या दौऱ्यात त्याने आठ कसोटी सामन्यांमध्ये केवळ एकदा 50 धावांचा आकडा पार केला आणि त्याची सरासरी 10.93 होती. भारताने बांगलादेशविरुद्धचे दोन्ही कसोटी सामने जिंकले, पण रोहितच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडने भारताला 3-0 ने पराभूत केले आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका भारताने 3-1 ने गमावली.
आता इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताला नवीन कसोटी कर्णधार मिळणार आहे. कर्णधार पदासाठी जसप्रीत बुमराह, केएल राहुल, शुभमन गिल आणि ऋषभ पंत या नावांची चर्चा आहे. रिपोर्टनुसार, शुभमन गिल भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी कर्णधार म्हणून रोहित शर्माची जागा घेण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. “शुभमन गिलच्या नावाची कर्णधारपदासाठी चर्चा सुरू आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची सुरुवात असल्याने आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे.”