Sharad Pawar | पवार काका-पुतणे एकत्र येणार? शरद पवारांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा

NCP Sharad Pawar Ajit Pawar Merge

NCP Sharad Pawar Ajit Pawar Merge | महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही (NCP) फूट पडल्यानंतर, आता शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. “राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवार गट एकत्र येण्याचा निर्णय आता खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच घ्यावा,” असं धक्कादायक विधान शरद पवारांनी केलं आहे.

शरद पवारांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की, त्यांच्या पक्षात दोन मतप्रवाह आहेत. एका गटाला अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेससोबत पुन्हा एकत्र यायचं आहे, तर दुसऱ्या गटाला भाजपसोबत न जाता इंडिया आघाडीत (सहभागी होऊन आघाडीची पुनर्रचना करायची आहे.” यावर बोलताना शरद पवार म्हणाले, “एकत्र यायचं की नाही आणि पुढे कसं जायचं, हे आता सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनीच ठरवावं.”

“पक्ष उभा करताना आज बाजूला गेलेले सगळे एकत्रच होते. सगळ्यांची विचारधारा एकच असल्याने भविष्यात जर सगळे एकत्र आले, तर मला आश्चर्य वाटणार नाही,” असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. “दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा हा प्रश्न नाही, विचारसरणी कधी ना कधी एकच होती, त्याचा हा प्रश्न आहे. मी आता सक्रिय राजकारणात राहणार नसल्यामुळे जो काही निर्णय आहे, तो सुप्रिया आणि अजितनेच घ्यावा,” असंही ते म्हणाले.

शरद पवारांनी पुढे सांगितलं की, “राज्यातील आमच्या काही आमदारांना असं वाटतं की, मतदारसंघातील विकासकामे करून घेण्यासाठी अजित पवारांसोबत गेलं पाहिजे, पण याबाबतचा निर्णय मी देणार नाही, त्यांनी तो निर्णय एकत्र बसून घ्यावा.”

“जनतेला मोदींना पर्याय हवा आहे, पण विरोधक तो देऊ शकलेले नाहीत. अनेक जण प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष भाजपसोबत न जाण्याची भूमिका मांडत इंडिया आघाडीसोबत कायम राहण्याचे मत मांडत आहेत. परंतु, इंडिया आघाडी सध्या सक्रिय नाही. त्यामुळे आम्हाला संघटनेसोबत पक्ष पुन्हा उभा करावा लागणार आहे. युवकांना सोबत घेऊन काम करावे लागणार आहे,” असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. “आमचा विचार विरोधी पक्षात काम करण्याचा आहे. आपण भाजपला एक विश्वासार्ह पर्याय निर्माण केला पाहिजे,” असंही ते म्हणाले.

“संसदेत सत्ताधारी पक्षासोबत बसायचं की, विरोधी पक्षासोबत बसायचं, याचा निर्णयही आता सुप्रिया सुळेंनीच घ्यावा,” असं शरद पवार म्हणाले. “माझे सगळे खासदार एक मताचे आहेत, आमदारांमध्ये अस्वस्थता असू शकते, मी निर्णय प्रक्रियेपासून खूप लांब आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय जयंत पाटलांनी घ्यावा,” असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवार आणि शरद पवार यांच्या अलीकडील भेटी राजकीय कारणांसाठी नव्हत्या, असंही शरद पवारांनी स्पष्ट केलं. “शैक्षणिक संस्थांसह अनेक संस्था आहेत, जिथे आम्ही त्यांच्यासोबत, एनडीएसोबत, डाव्या पक्षांसोबत काम करतो आणि आम्ही ते करत राहू,” असं त्यांनी सांगितलं.

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत खरोखर काय चूक झाली, हे मला माहित नाही. येथील परिस्थिती आमच्या बाजूने होती. लोकसभा निवडणुकीचा निकाल आमच्या बाजूने लागला, तेव्हा विधानसभेतील (निवडणुकांमध्ये) काय झाले? आम्ही जिथे जातो तिथे प्रत्येक गावातील लोक म्हणतात की, आम्ही लोकसभा निवडणुकीत जसे मतदान केले होते, तसेच विधानसभा निवडणुकीतही मतदान केले, पण निकाल वेगळा होता. मी निवडणूक आयोगाबद्दल कोणतेही कठोर विधान करू इच्छित नाही,” असं शरद पवार म्हणाले.