पाकिस्तानकडून भारतावर सायबर हल्ला, काय आहे ‘Dance of the Hillary’ व्हायरस?

Dance of the Hillary Virus

Dance of the Hillary Virus | पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तानसोबतचा तणाव वाढला आहे. या परिस्थितीत पाककडून सायबर हल्ला केला जात आहे. ‘डान्स ऑफ द हिलरी’ (Dance of the Hillary) हा एक नवीन सायबर हल्ला असून, हॅकर्स याद्वारे भारतीयांना लक्ष्य करत आहेत. यासाठी व्हॉट्सॲपसारख्या (WhatsApp) लोकप्रिय प्लॅटफॉर्मचा वापर केला जात आहे.

भारतीय गुप्तचर संस्थांनी (Indian Intelligence agencies) लोकांना या नवीन व्हायरस हल्ल्याबाबत सतर्क केले आहे. हा व्हायरस तुमच्या डिव्हाइसचा रिमोट ॲक्सेस घेऊ शकतो आणि महत्त्वाची माहिती चोरू शकतो.

‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरस: तुमच्या डिव्हाइसवर कसा हल्ला करू शकतो?

‘डान्स ऑफ द हिलरी’ व्हायरस/मालवेअर (Malware) व्हिडिओ फाईल्स आणि डॉक्युमेंट्सच्या माध्यमातून तुमच्या डिव्हाइसमध्ये प्रवेश करू शकतो. हॅकर्स हे लोकप्रिय माध्यम वापरत आहेत, जे लोक अनेकदा त्यांच्या फोन/टॅबलेट किंवा पीसीवर डाउनलोड किंवा ओपन करतात.

एकदा तुम्ही या व्हिडिओ असलेले मेसेजेस ओपन केले की, व्हायरस तुमच्या डिव्हाइसचा ताबा घेतो आणि अनधिकृत व्यक्तींना तुमचा डेटा चोरण्याची आणि पासवर्ड आणि आर्थिक-वैयक्तिक माहिती पाहण्याची परवानगी देतो.

व्हॉट्सॲप, टेलिग्राम आणि तुमच्या ईमेलसारख्या ॲप्सद्वारे पीडीएफ फाईल्सचाही अॅक्सेस मिळतो. रिपोर्टनुसार, हा व्हायरस पाकिस्तानमधील हॅकर्सनी (Hackers) प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केला आहे

‘डान्स ऑफ द हिलरी’ हल्ला: सुरक्षित कसे राहावे आणि काय करू नये?

सुरक्षा संस्थांनी लोकांना बनावट नोकरीच्या ऑफर किंवा अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या व्हिडिओ असलेल्या कोणत्याही ईमेल/मेसेजला बळी पडू नये, असा इशारा दिला आहे. तुम्ही व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या ॲप्सवर मीडिया फाईल्सचा ऑटो-डाउनलोड पर्याय बंद करू शकता, ज्यामुळे त्यांना तुमच्या डिव्हाइसवर सहज प्रवेश मिळणार नाही.

  • तुमच्या डेटाचा बॅकअप ठेवा आणि डिव्हाइसवर गोपनीय माहिती स्टोर करू नका.
  • संशयास्पद ईमेल/मेसेजवर क्लिक करू नका.
  • टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two-factor authentication) किंवा थर्ड-पार्टी ऑथेंटिकेटर ॲप्सने (Third-party authenticator apps) तुमची खाती सुरक्षित करा.
  • अनोळखी व्यक्तींना तुमच्या फोनचा ॲक्सेस देऊ नका किंवा त्यांच्यासोबत ओटीपी (OTP) शेअर करू नका.
  • +९२ ने सुरू होणारे आंतरराष्ट्रीय नंबरवरून येणारे सर्व व्हिडिओ कॉल किंवा मेसेज ब्लॉक करा.

लोक सुरक्षित, जागरूक आणि सावध राहून आणि कोणतीही ऑफर किंवा मेसेज जो खूप चांगला वाटतो त्यावर क्लिक न करता अशा सापळ्यांपासून वाचू शकतात.