ऑपरेशन सिंदूर सुरूच! हवाई दलाची पोस्टयुद्धबंदी मोडणाऱ्या पाकला पुन्हा अद्दल घडवणार


नवी दिल्ली – भारत-पाकिस्तान यांच्यात काल झालेल्या शस्त्रसंधीचे पाकिस्तानने अवघ्या काही तासांतच उल्लंघन केल्यानंतर भारताने सावधगिरीची भूमिका बाळगली आहे. आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यात संरक्षण मंत्री, लष्करप्रमुख, तिन्ही सैन्याचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, गुप्तचर विभाग आणि रॉचे प्रमुख उपस्थित होते. हवाई दलानेही एक सूचक पोस्ट करून म्हटले की, ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच आहे. दरम्यान, काल रात्री युद्धबंदी मोडून गोळीबार आणि ड्रोन हल्ले करणाऱ्या पाकिस्तानने आज दिवसभरात नवी कुरापत काढली नाही. त्यामुळे राजस्थान-पंजाब, जम्मू-काश्मीर सीमेवर शांतता होती.
काल भारत-पाकिस्तानने शस्त्रसंधीला मान्यता दिल्यानंतरही केवळ तीन तासांत रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील सीमाभागातील अनेक शहरे आणि गावांवर हल्ला केला. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर देऊन ते परतवून लावले. भारताने आपल्या लष्कराला कठोर कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर पाकिस्तानचे हल्ले थांबले. मात्र, शस्त्रसंधी मोडून पाकिस्तानने विश्वासघात केल्याची भारताची भावना झाली आहे. कालच्या घडामोडींचे पडसाद आज दिल्लीत उमटले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान, तिन्ही सैन्याचे प्रमुख, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल तसेच गुप्तचर विभाग आणि रॉचे प्रमुख उपस्थित होते. ही बैठक तब्बल दोन तास चालली. या बैठकीत युद्धबंदीनंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. उद्या भारत आणि पाकिस्तानच्या डायरेक्टर ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीत भारत पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित करेल.
भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यामध्ये लष्करी ऑपरेशन्सचे महासंचालक (डीजीएमओ) लेफ्टनंट जनरल राजीव घई, व्हाइस ॲडमिरल एएन प्रमोद आणि एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी ते म्हणाले की, पाकिस्तानने युद्धबंदी तोडल्यास जोरदार प्रत्युत्तर देऊ. तिथून गोळी सुटली तर
इथूनही सुटेल.
आज सकाळी सीमेला लागून असलेल्या जम्मू आणि काश्मीर, राजस्थान आणि पंजाबमध्ये सर्वसामान्य परिस्थिती होती. श्रीनगरमध्येही बाजारपेठा खुल्या होत्या. लाल चौकात लोकांची वर्दळ होती. शस्त्रसंधी झाली नसली तरी जम्मू-काश्मीर पोलिसांनी सीमावर्ती गावांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरी परतण्याची घाई न करण्याचे आणि सुरक्षित ठिकाणीच राहण्याचे आवाहन केले आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे, नियंत्रण रेषेजवळील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा येथील सव्वा लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्यात आले आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी त्यांना आवाहन केले की, जोपर्यंत परिसराची सफाई केली जात नाही आणि स्फोट न झालेले तोफगोळे काढून टाकले जात नाहीत तोपर्यंत लोकांनी त्यांच्या घरी परतू नये.
राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यातील भटोडा गावात आज सकाळी जिवंत स्फोटके आढळली. ही स्फोटके गावातील
काही नागरिकांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस आणि लष्कराचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संबंधित परिसर सील करण्यात आला आणि नागरिकांना त्या ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली. यानंतर लष्कराच्या ताफ्याने तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर ही स्फोटके निष्क्रिय केली. युद्ध परिस्थिती लक्षात घेऊन
राजस्थानमध्ये रद्द केलेल्या 16 आणि अंशतः रद्द केलेल्या 11 गाड्या आता पूर्ववत करण्यात आल्या आहेत.मात्र, विमान सेवा अजून सुरळीत झालेली नाही.
पहलगाम हल्ल्याच्या दिवसापासून कालपर्यंतपाकिस्तानच्या गोळीबारात 5 सैनिक शहीद झाले आहेत. 25 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हून अधिक जण
जखमी झाले आहेत. आज भारतीय हवाई दलाने एक्सवरून केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूरमध्ये नेमून दिलेली कामे अचूकपणे आणि व्यावसायिकतेने यशस्वीरित्या पार पाडली आहेत. राष्ट्रीय उद्दिष्टाला सुसंगत राहून हे ऑपरेशन विचारपूर्वक आणि विवेकपूर्णपणे पार पाडले. हे ऑपरेशन अजूनही सुरू असल्याने याबाबत योग्यवेळी सविस्तर माहिती दिली जाईल. नागरिकांनी खोटी आणि चुकीची माहिती प्रसारित करण्यापासून दूर राहावे.
दिल्लीत शस्त्रसंधीवर चर्चा सुरू असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा भुवया उंचावणारे वक्तव्य आहे. काल अमेरिकेच्या मध्यस्थीनंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी जाहीर केले होते. आज ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यशी माझी या विषयावर फारशी चर्चा झालेली नाही. मात्र दोन्ही देशांसह व्यापार विस्तार करण्याची अमेरिकेची भूमिका आहे. मी दोन्ही देशांशी चर्चा करुन आम्ही काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन. त्यांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा वाद होण्याची शक्यता आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पुढील आठवड्यात बैठक
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. या परिषदेसाठी भारत आपले पथक पाठविणार आहे. हे पथक पाकिस्तानच्या दशहतवाद्याचे पुरावे सादर करणार आहेत.