Taliban Bans Chess in Afghanistan | तालिबानने (Taliban) धार्मिक कारणांमुळे अफगाणिस्तानात बुद्धिबळावर (Chess) बंदी घातली आहे. विविध प्रकारचे मनोरंजन आणि खेळांना असलेला त्यांचा विरोध कायम ठेवत, तालिबानच्या Ministry of Promotion of Virtue and Prevention of Vice ने हे निर्बंध जारी केले आहेत.
रिपोर्टनुसार, हा निर्णय “धार्मिक विचार” आणि तालिबानच्या मंत्रालयाने जाहीर केलेल्या निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे आता अफगाणिस्तानातील बुद्धिबळ संबंधित सर्व उपक्रम अनिश्चित काळासाठी थांबले आहेत. तालिबानच्या नेतृत्वाखालील क्रीडा मंत्रालयाच्या (Sports Ministry) अधिकाऱ्यांनी रविवारी बुद्धिबळ खेळावर बंदी घालण्यात आल्याचे सांगितले. धार्मिक चिंतांबाबत योग्य प्रतिसाद मिळेपर्यंत हा खेळ देशात प्रतिबंधित राहील, असे त्यांनी सांगितले.
या समस्यांचे निराकरण केल्याशिवाय बुद्धिबळाशी संबंधित कोणत्याही उपक्रमांना पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिली जाणार नाही. खामा प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, तालिबानच्या मंत्रालयाने अफगाणिस्तान बुद्धिबळ महासंघदेखील बरखास्त केला आहे. इस्लामिक कायद्याच्या त्यांच्या व्याख्येनुसार हा खेळ “हराम” (निषिद्ध) आहे, असे कारण यामागे देण्यात आले आहे.
तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानात सांस्कृतिक, सामाजिक आणि क्रीडा स्पर्धांवर अनेक निर्बंध लादले आहेत, अशा परिस्थितीत हा निर्णय आला आहे. तालिबानच्या घोषणेपूर्वी, अनेक बुद्धिबळपटू आणि नागरिकांनी हा खेळ सुरू ठेवण्याची विनंती केली होती. मात्र, तालिबानने बंदीची घोषणा केल्याने आता नागरिकांना बुद्धिबळ खेळता येणार नाही.
तालिबानने अफगाणिस्तानातील महिलांवरही अनेक निर्बंध लादले आहेत. ही धोरणे किती काळ टिकतील किंवा आंतरराष्ट्रीय समुदाय तालिबानवर त्यांचे निर्णय बदलण्यासाठी दबाव आणण्यात यशस्वी होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.