S-500 Air Defence System | भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नुकत्याच झालेल्या तणावात, भारताच्या हवाई सुरक्षा प्रणालीने (Air Defence System) महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानच्या सततच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या प्रयत्नांना भारतीय हवाई संरक्षण दलाने हवेतच निष्फळ ठरवले.
भारताच्या शक्तिशाली हवाई सुरक्षा प्रणालीने पुन्हा एकदा सिद्ध केले की देशाची सुरक्षा मजबूत हातात आहे. पाकिस्तानचे हल्ले निष्फळ ठरवण्यात ए,-400 या एअर डिफेन्स सिस्टिमची महत्त्वाची भूमिका होती. रशियाच्या या यंत्रणेने पाकिस्तानवर वरचढ ठरण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.
रिपोर्टनुसार, आता रशियाने भारताला एस 400 पेक्षाही शक्तीशाली एस-500 एअर डिफेन्स सिस्टमचे संयुक्त उत्पादन करण्याचा प्रस्ताव दिला आहे. ही संरक्षण प्रणाली भारताच्या लष्करी शक्तीत आणखी वाढ करू शकते. मात्र, याबाबत अद्याप दोन्ही देशांनी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही.
एस-500: हवाई सुरक्षा प्रणालीची नवीन पिढी
एस-500 हे एस-400 च्या तुलनेत खूपच आधुनिक आहे. एस-400 ची क्षमता मुख्यत्वे जमिनीवरून हवेतील लक्ष्यांपर्यंत मर्यादित होती, तर एस-500 एक बहुस्तरीय, मल्टी टार्गेट आणि अंतराळातही कार्य करू शकणारी संरक्षण प्रणाली आहे. हे पृथ्वी आणि अंतराळ या दोन्ही स्तरांवर शत्रूची विमाने, क्षेपणास्त्रे आणि उपग्रह नष्ट करण्यासाठी डिझाइन केलेले आहे. रिपोर्टनुसार, 2020 मध्ये एका एस-500 प्रणालीची अंदाजित किंमत सुमारे 70–80 कोटी डॉलर्स होती, जी 2023 मध्ये वाढून सुमारे 2.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे.
एस-500 मध्ये काय आहे खास?
- अंतराळापासून पृथ्वीपर्यंत सुरक्षा: एस-500 केवळ हवाईच नव्हे, तर अंतराळात असलेल्या शत्रूच्या उपग्रहांनाही नष्ट करण्याची क्षमता ठेवते. याला ‘स्पेस-डिफेन्स कॅपेबल’ म्हणता येईल.
- मोठी रेंज आणि वेग: या प्रणालीची मारक क्षमता सुमारे 600 किलोमीटरपर्यंत आहे, जी याला जगातील सर्वात लांब पल्ल्याची आणि शक्तिशाली संरक्षण प्रणाली बनवते. याबद्दल असेही म्हटले जाते की ते मॅक-20 च्या वेगाने एकाच वेळी 10 लक्ष्यांना भेदून नष्ट करू शकते.
- हायपरसोनिक क्षेपणास्त्रांचा नाश: एस-500 मध्ये हायपरसोनिक क्षेपणास्त्रांनाही पाडण्याची क्षमता आहे, जे सध्या जगातील सर्वात वेगवान शस्त्र मानले जातात. ही क्षमता याला त्याच्या श्रेणीत आणखी खास बनवते.
एस-400 आणि एस-500 मधील फरक
एस-400 केवळ हवाई सुरक्षेसाठी डिझाइन केले गेले होते, तर एस-500 ने त्या पलीकडे जाऊन अंतराळातील सुरक्षेचीही काळजी घेतली आहे. एस-400 ची मारक क्षमता 400 किलोमीटरपर्यंत होती, तर एस-500 ची रेंज 600 किलोमीटरपर्यंत आहे. याव्यतिरिक्त, एस-500 अनेक प्रकारची क्षेपणास्त्रे आणि विमानांविरुद्ध अधिक प्रभावी ठरू शकते, विशेषतः हायपरसोनिक क्षेपणास्त्रांविरुद्ध.
भारत आणि रशियाचा संयुक्त उत्पादन करार
एस-400 च्या यशानंतर, आता रशियाने भारताला एस-500 च्या संयुक्त उत्पादनाची ऑफर दिली आहे. यामुळे भारताला केवळ संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरता मिळणार नाही, तर ते रशिया-भारत सहकार्यालाही नवी दिशा देईल. अशा परिस्थितीत, भारताला आगामी वर्षांमध्ये एक अत्याधुनिक हवाई सुरक्षा प्रणाली मिळू शकते, जी केवळ सीमा सुरक्षाच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीतही महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते. एस-500 चा भारतात वापर येत्या काळात पाकिस्तान आणि इतर देशांकडून होणाऱ्या धोक्यांचा सामना करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरू शकतो.