Bhargavastra Air Defence System | पाकिस्तानकडून करण्यात येणाऱ्या हवाई हल्ल्यांना रोखण्यामध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने मोठी भूमिका बजावली. आता लष्कराला आणखी एक स्वदेशी ड्रोनविरोधी सिस्टीम मिळाली आहे. यामुळे लष्कराची ताकद आणखी वाढली आहे.
सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड (SDAL) या कंपनीने ‘भार्गवास्त्र’ (Bhargavastra) नावाचे कमी खर्चाचे आणि ‘हार्ड किल’ (Hard Kill) क्षमतेचे नवीन ड्रोनविरोधी सिस्टीम विकसित केले आहे. ड्रोन हल्ल्यांच्या वाढत्या धोक्याला तोंड देण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
या ड्रोनविरोधी प्रणालीत वापरल्या जाणाऱ्या सूक्ष्म रॉकेटची ओडिशातील गोपालपूर येथील सीवर्ड फायरिंग रेंजमध्ये यशस्वी चाचणी पार पडली.
लष्कराच्या हवाई संरक्षण दलाच्या (Army Air Defence – AAD) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत १३ मे रोजी गोपालपूर येथे रॉकेटच्या तीन चाचण्या घेण्यात आल्या. दोन चाचण्यांमध्ये प्रत्येकी एक रॉकेट फायर करण्यात आले. तर एका चाचणीत दोन रॉकेट एकाच वेळी (Salvo Mode) दोन सेकंदात फायर करण्यात आले. चारही रॉकेट अपेक्षेप्रमाणे कार्यरत झाले आणि आवश्यक प्रक्षेपण मापदंड पूर्ण केले, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे ड्रोन हल्ले निष्प्रभ करण्याची या प्रणालीची क्षमता सिद्ध झाली.
#WATCH | A new low-cost Counter Drone System in Hard Kill mode 'Bhargavastra', has been designed and developed by Solar Defence and Aerospace Limited (SDAL), signifying a substantial leap in countering the escalating threat of drone swarms. The micro rockets used in this… pic.twitter.com/qM4FWtEF43
— ANI (@ANI) May 14, 2025
‘भार्गवास्त्र’ प्रणालीमध्ये लहान, येणाऱ्या ड्रोनला २.५ किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर शोधून नष्ट करण्याची प्रगत क्षमता आहे. संरक्षणाच्या पहिल्या स्तरामध्ये ही प्रणाली बिनमार्गदर्शित सूक्ष्म रॉकेटचा वापर करते, जी २० मीटरच्या घातक त्रिज्येमध्ये ड्रोनच्या मोठ्या गटांना निष्प्रभ करू शकते. दुसऱ्या स्तरामध्ये अचूकतेसाठी मार्गदर्शित सूक्ष्म-क्षेपणास्त्राचा वापर केला जातो, ज्याची चाचणी यापूर्वीच यशस्वी झाली आहे.
समुद्रसपाटीपासून ५,००० मीटर आणि त्याहून अधिक उंचीच्या दुर्गम भागांसह विविध भूभागांवर सहजपणे तैनात करण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय सशस्त्र दलाच्या विशिष्ट कार्यात्मक गरजा पूर्ण होतात.
एसडीएलने त्यांनी सांगितले की, शत्रुत्वाचे यूएव्ही (UAVs) नष्ट करण्यासाठी या प्रणालीची स्वदेशी रचना आहे आणि समर्पित रॉकेट व सूक्ष्म-क्षेपणास्त्रे विकसित केली आहेत. ही प्रणाली मॉड्यूलर आहे आणि त्यात जामिंग, स्पूफिंगचा समावेश असलेला अतिरिक्त ‘सॉफ्ट किल’ स्तर देखील असू शकतो. याव्यतिरिक्त, ही प्रणाली सध्याच्या नेटवर्क-केंद्रित युद्ध पायाभूत सुविधांमध्ये सहजपणे वापरण्यासाठी देखील तयार केली गेली आहे.
या प्रणालीचे रडार ६ ते १० किलोमीटर अंतरावर असलेल्या लहान हवाई धोक्यांना देखील शोधू शकते. त्याचे इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड (EO/IR) सेन्सर कमी रडार क्रॉस-सेक्शन असलेल्या लक्ष्यांची अचूक ओळख सुनिश्चित करते.
‘मेक इन इंडिया’ (Make in India) धोरणासाठी हे आणखी एक यश आहे आणि भारताच्या मजबूत हवाई संरक्षण छत्राला अधिक बळकट करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.