कर्नल सोफिया कुरेशींबद्दल अपमानास्पद टिप्पणी! न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री विजय शाह यांच्याविरोधात FIR दाखल

FIR registered against M.P. Minister Vijay Shah |

FIR registered against M.P. Minister Vijay Shah | भारतीय लष्कराच्या महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी (Colonel Sofiya Qureshi) यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणे मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह (M.P. Minister Vijay Shah) यांना महागात पडले आहे. सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.न्यायमूर्ती अतुल श्रीधरनयांनी माध्यमांमधील बातम्यांवरून स्वतः या घटनेची दखल घेतली. त्यांनी पोलीस महासंचालक कैलाश मकवानायांना निर्देश दिले की भारतीय न्याय संहिता (Bharatiya Nyaya Sanhita – BNS) अंतर्गत कलम 196 (धार्मिक गटांमध्ये तेढ निर्माण करणे) आणि कलम 152 (सार्वभौमत्व व एकतेला धोका पोहोचवणे) याखाली गुन्हा नोंदवावा.

न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की, “कर्नल सोफिया कुरेशी मुस्लिम आहेत आणि त्यांना ‘दहशतवाद्यांची बहीण’ म्हणून संबोधणे हे धार्मिक सलोखा बिघडवणारे कृत्य आहे. यामुळे देशासाठी कार्य करणाऱ्या एखाद्या मुस्लिम व्यक्तीकडेही शंका घेण्याची प्रवृत्ती निर्माण होऊ शकते.”

दरम्यान, मुख्यमंत्री मोहन यादव (Chief Minister Mohan Yadav) हे बेंगळूरु दौर्‍यावर असताना, त्यांनीही या प्रकरणात तत्काळ कारवाईचे निर्देश दिले.

एफआयआर दाखल

मुख्यमंत्री यादव यांच्या परतीनंतर काही मिनिटांतच इंदूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हितिका वासल (SP Hitika Vasal) यांनी एफआयआर दाखल झाल्याची पुष्टी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 12 मे रोजी इंदूरच्या मानपूर तालुक्यातील रायकुंडा गावातील कार्यक्रमात विजय शाह यांनी वादग्रस्त भाषण दिले. त्यातील काही भाग सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

न्यायालयाने स्वतःहून दखल घेत आदेश दिल्यानंतर शाह यांच्याविरोधात BNS कलम 152, 196(1)(b), 197(1)(k) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाची पुढील सुनावणी आज (15 मे) होणार आहे.

शाह यांची माफी

वादग्रस्त वक्तव्य व्हायरल झाल्यानंतर विजय शाह यांनी आपल्या वक्तव्याबद्दल पुन्हा एकदा माफी मागितली आहे. त्यांनी “बहीण सोफिया” आणि लष्कराबद्दल आदर व्यक्त करत आपण कोणाचाही अपमान करण्याचा हेतू नव्हता, असे स्पष्ट केले.

न्यायालयाने म्हटले, “शाह यांची वक्तव्ये अत्यंत धोकादायक असून त्यांनी लष्करासारख्या प्रतिष्ठित संस्थेच्या अधिकाऱ्यांवर टोकाची, अपमानजनक भाषा वापरली आहे. सशस्त्र दल हे निस्वार्थता, सचोटी आणि चारित्र्याचे प्रतीक आहे. हे देशातील अखेरचे शिल्लक असलेले विश्वासार्ह संस्थात्मक प्रतीक आहे, आणि त्यावर अशा प्रकारे प्रहार करणे गंभीर आहे.”