Anita Anand | कॅनडाच्या पहिल्या हिंदू परराष्ट्रमंत्री अनिता आनंद कोण आहेत? जाणून घ्या

Anita Anand

Anita Anand | कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी (Mark Carney) यांनी मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाची घोषणा करत अनिता आनंद (Anita Anand) यांना परराष्ट्र मंत्री म्हणून नेमले आहे. त्या मेलानी जोली (Mélanie Joly) यांची जागा घेणार असून, जोली यांना उद्योग मंत्रालय देण्यात आले आहे. अनिता आनंद या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्र मंत्री ठरल्या आहेत.

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर अनिता आनंद यांनी ‘एक्स’ (X) या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले, “कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्त होण्याचा मला सन्मान वाटतो. पंतप्रधान मार्क कार्नी आणि त्यांच्या टीमसोबत सुरक्षित व न्याय्य जग निर्माण करण्यासाठी काम करण्यास मी उत्सुक आहे.”

३८ सदस्यीय नवीन मंत्रिमंडळ जाहीर

मंगळवारी मार्क कार्नी यांनी ३८ सदस्यीय मंत्रिमंडळ जाहीर केले, ज्यात २८ मंत्री आणि १० राज्य सचिवांचा समावेश आहे. नवीन सरकारची धोरणे जाहीर करताना, अमेरिकेसोबत आर्थिक व सुरक्षा सहकार्य वाढवणे, महागाई कमी करणे आणि अर्थव्यवस्था मजबूत करणे हे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे कार्नी यांनी सांगितले.

अनिता आनंद कोण आहेत?

अनिता इंदिरा आनंद या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्र मंत्री ठरल्या आहेत. याआधी त्यांनी संरक्षण, परिवहन आणि विज्ञान मंत्रालयांची धुरा सांभाळली आहे. त्या एक अनुभवी वकील, शिक्षिका, संशोधक आणि चार मुलांची आई आहेत.

त्यांचा जन्म केंटव्हिल, नोव्हा स्कॉशिया येथे भारतीय मूळ असलेल्या डॉक्टर पालकांच्या घरी झाला. त्यांची आई पंजाब आणि वडील तामिळनाडूचे आहेत. त्यांनी क्वीन्स युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड, डलहौसी आणि टोरंटो विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.

कोविड-१९ (Covid-19) काळात त्यांनी सार्वजनिक खरेदी मंत्रालय सांभाळून लस खरेदी आणि PPE पुरवठा सुनिश्चित केला. नंतर संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कॅनडाच्या सशस्त्र दलात (Canadian Armed Forces) बदल घडवण्याचा प्रयत्न केला.

रशियाने युक्रेनवर (Ukraine) आक्रमण केल्यानंतर, आनंद यांनी युक्रेनला लष्करी सहाय्य पुरवणाऱ्या मोहिमेचे नेतृत्व केले, ज्यात कॅनेडियन प्रशिक्षक आणि संरक्षण सामग्रीचा समावेश होता.