महापालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार की स्वतंत्र? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Devendra Fadnavis on Municipal Elections

Devendra Fadnavis on Municipal Elections | सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 120 दिवसांत घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यात राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र, आगामी महापालिका निवडणुका महायुती व महाविकास आघाडी एकत्र लढणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.

महापालिका निवडणूक महायुती एकत्र लढणार की स्वतंत्रपणे याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाष्य केले आहे. “महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आहे, मात्र काही अपवादात्मक ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले. त्याच वेळी, “ज्या ठिकाणी तुल्यबळ परिस्थिती आहे, तेथे मित्र पक्षाला जास्त जागा सोडता येणार नाहीत,” असेही ते म्हणाले, ज्यामुळे स्वबळावर लढण्याचे संकेत मिळत आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी निवडणूक वेळेत घेण्याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले. “निवडणूक वेळेत घेण्याबाबत कोणतीही अडचण सध्या दिसत नाही. ज्या भागात पावसाची अडचण असेल, तेथे निवडणूक आयोग आणि राज्य सरकार चर्चा करून काही दिवसांची वेळ घेईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे म्हटले आहे. “कार्यकर्ते दीर्घकाळ काम करतात, त्यांना निवडणूक लढवावी, असे वाटणे साहजिकच आहे. त्यामुळे काही ठिकाणी स्वतंत्र निवडणूक लढविली जाईल. मात्र, हे करताना एकमेकांवर कोणतीही टीका केली जाणार नाही,” असे स्पष्ट केले. “निवडणुकीनंतर निवडून येतील ते पुन्हा एकत्रच येतील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मात्र महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातूनच लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “आम्ही लोकसभा, विधानसभा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढलो. आता येणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकाही आम्ही महायुतीच्याच माध्यमातून लढणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.