Çelebi Aviation Stock Down | भारत सरकारने ‘सेलेबी एव्हिएशन इंडिया’ची (Çelebi Aviation India) सुरक्षा मंजुरी रद्दकेल्यानंतर तुर्कस्तानमधील मुख्य कंपनी ‘सेलेबी हवा सर्व्हिसी एएस’च्या (Çelebi Hava Servisi AS) शेअर्सच्या किंमतीत मोठी घसरण झाली आहे.
16 मे रोजी दुसऱ्या सत्रातही या कंपनीच्या शेअर्समध्ये 10% घसरण झाली असून ते 2,000 तुर्की लिरांवर (Turkish Lira) आले. दिवसअखेर हे शेअर्स 2,224 लिरांवर स्थिरावले, म्हणजेच सलग दोन सत्रात एकूण 19% घसरण नोंदवली गेली.
याच पार्श्वभूमीवर बंगळूरु आंतरराष्ट्रीय विमानतळानेही ‘सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस’कडून (Çelebi Airport Services) ग्राउंड हँडलिंग सेवा इतर सेवा पुरवठादारांकडे हस्तांतरित केल्या आहेत. या निर्णयाला नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरोच्या (BCAS) राष्ट्रीय निर्देशांचे समर्थन मिळाले आहे.
भारत सरकारने 15 मे रोजी देशातील प्रमुख विमानतळांवर कार्यरत असलेल्या या तुर्की कंपनीच्या मंजुरीला राजकीय कारणांमुळे अखेर थांबवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाआधी दिल्ली, मुंबई, अहमदाबादसारख्या विमानतळांनीही सेलेबीशी संबंध तोडले होते. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने केलेल्या कारवाईनंतर तुर्कीने पाकिस्तानला दिलेल्या उघड पाठिंब्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
सेलेबी एव्हिएशन भारतात दोन संस्थांद्वारे कार्यरत आहे. यामध्ये ‘सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया’ आणि ‘सेलेबी दिल्ली कार्गो टर्मिनल मॅनेजमेंट इंडिया’चा समावेश आहे. या कंपन्या दिल्ली, मुंबई आणि इतर शहरांतील विमानतळांवर 70% ग्राउंड आणि कार्गो सेवा पुरवतात.
या वाढत्या छाननीच्या पार्श्वभूमीवर कंपनीने सुरक्षा मंजुरी रद्द करण्यामागे राजकीय हेतू नसल्याचे स्पष्ट केले आहे.
सेलेबीचं कामकाज 9 भारतीय शहरांत विस्तारलेलं आहे, ज्यात हैदराबाद, कोचीन, चेन्नई यांचा समावेश आहे. यात प्रवासी हाताळणी, लोड कंट्रोल, फ्लाइट ऑपरेशन्स आणि कार्गो हाताळणी यांसारख्या सेवा दिल्या जातात.
कंपनीने स्वतःला व्यावसायिक पातळीवर कार्यरत असून कॅनडा, अमेरिका, युके, सिंगापूर, युएई, पश्चिम युरोपमधील गुंतवणूकदार असलेली संस्था (Global Aviation Services Company) म्हणून मांडले आहे. देशभरात तुर्कीच्या भूमिकेविरोधात जनभावना तीव्र होत असताना, ‘सेलेबी’ने आपली व्यावसायिक व जागतिक पातळीवरील प्रतिमा टिकवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे.