Jyoti Malhotra | हेरगिरीच्या आरोपात यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक! वडिलांनी सांगितले पाकिस्तानला जाण्याचे कारण

Jyoti Malhotra | हरियाणामधील यूट्यूबर ज्योती राणी मल्होत्रा (Jyoti Malhotra) हिला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. मात्र तिचे वडील हरीश मल्होत्रा यांनी या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले असून, ती फक्त यूट्युबसाठीव्हिडिओ बनवण्याच्या हेतूने पाकिस्तानला गेली होती, असा दावा केला आहे.

एएनआयशी बोलताना हरीश मल्होत्रा म्हणाले, “माझ्या मुलीने कोणतीही चूक केलेली नाही. ती व्हिडिओसाठी दिल्ली, पाकिस्तान आणि इतर देशांमध्ये जात असे. तिने आधीपासूनच सर्व कायदेशीर परवानग्या घेतल्या होत्या. पोलिसांनी आमचे फोन, बँक कागदपत्रे, लॅपटॉप आणि पासपोर्ट जप्त केले आहेत, ते आम्हाला परत मिळावेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, गेल्या 4–5 दिवसांपासून ज्योती हिसारमध्ये होती. जर तिचे पाकिस्तानात काही मित्र असतील, तर तिने त्यांच्याशी बोलू नये का? हा सवाल त्यांनी केला.

ज्योती मल्होत्रा हिला अटक का करण्यात आली?

हरियाणा पोलिसांनी ज्योती मल्होत्रा हिला पाकिस्तानी गुप्तचर संस्थांसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपावरून हिसारमधून अटक केली. डीएसपी कमलजीत यांच्या माहितीनुसार, तिच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून काही संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर तिला अटक करण्यात आली असून, ती पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत आहे.

कमलजीत यांनी स्पष्ट केले की, ज्योती पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांशी संवेदनशील माहिती शेअर करत होती. ती पाकिस्तानी नागरिक अहसान-उर-रहीम याच्या संपर्कात होती. तपासात असंही समोर आलं की, ज्योतीने 2023 मध्ये पाकिस्तान व्हिसासाठी अर्ज करताना दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात भेट दिली होती, जिथे तिची भेट अहसान-उर-रहीम उर्फ ‘दानिश’ याच्याशी झाली होती.

त्यानंतर तिने दोन वेळा पाकिस्तानला भेट दिली आणि तिथे तिच्या निवास व प्रवासाची व्यवस्था करण्यात आली होती. ANI च्या वृत्तानुसार, त्या दरम्यान तिच्या पाकिस्तानी सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांशी भेटी घडवून आणल्या गेल्या.