BYJU’S चे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बायजू रवींद्रन (Byju Raveendran) यांनी कंपनीतील अडचणींमुळे शिक्षणात व्यत्यय आलेल्या हजारो विद्यार्थ्यांची माफी मागितली आहे. या त्रासाबद्दल त्यांनी “मी त्यांना भरपाई देणार” असे स्पष्ट सांगत, कंपनी AI-आधारित नवीन शिक्षण मॉडेलसह पुन्हा सुरू होईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.
एएनआय (ANI) ला दिलेल्या मुलाखतीत रवींद्रन यांनी मान्य केले की, 2023 मध्ये कंपनीच्या आर्थिक संकटांमुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. सप्टेंबर 2023 मध्ये शिक्षकांचे वेतन थांबवावे लागल्यामुळे ही अडचण निर्माण झाली होती. मात्र, कंपनीचे मूळ उत्पादन कार्यरत राहिले, आणि लाखो विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे त्यांनी नमूद केले.
BYJU’S 3.0 – AI वर आधारित नवीन शिक्षण प्रणाली
रवींद्रन यांनी BYJU’S 3.0 या नव्या प्लॅटफॉर्मची माहिती दिली, जो अधिक सुलभ, मनोरंजक आणि AI-सक्षम असेल. या प्रणालीद्वारे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी वैयक्तिक शिक्षक उपलब्ध करून दिला जाईल. त्यांच्या म्हणण्यानुसार, हे मॉडेल शिक्षणात क्रांती घडवू शकते.
रवींद्रन यांनी दावा केला की आज दोन वर्षांपूर्वीपेक्षा जास्त विद्यार्थी BYJU’S च्या प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत, ज्यामध्ये 250 दशलक्षाहून अधिक विद्यार्थी विविध प्लॅटफॉर्मवर आहेत. “ते इतरांपेक्षा पाचपट जास्त आहेत. तुम्ही त्यांना स्पर्धक म्हणू शकता की नाही हे देखील मला माहीत नाही,” असे ते पुढे म्हणाले.
आक्रमक विक्री पद्धतींवर झालेल्या टीकेवर रवींद्रन यांनी कबुली दिली की, काहींनी चुकीचे वर्तन केले, पण कंपनीने त्या चुका सुधारल्या आहेत. “मी माझ्या मुलाला जे शिकवतो, तेच इतर विद्यार्थ्यांनाही देतो,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांनी WhiteHat Junior चा अनुभव उदाहरणादाखल दिला. “मी कधीही असे उत्पादन विकणार नाही जे घरी वापरले जात नाही किंवा जे मी माझ्या मुलाला देणार नाही. त्याने व्हाइटहॅट ज्युनियरमधून (WhiteHat Junior) गणित आणि कोडिंगची मूलभूत संकल्पना शिकली,” असे ते म्हणाले.
BYJU’S ही एकेकाळी भारतातील सर्वात मोठी edtech कंपनी (edtech darling) होती. कोविड-19 (Covid-19) काळात मोठी भरारी घेतल्यानंतर आता कंपनी नियामक (regulatory), आर्थिक आणि कायदेशीर आव्हानांना तोंड देत आहे. तरीही रवींद्रन यांनी स्पष्ट केले की, “हार मानण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही नव्याने सुरुवात करू.”