आशिया कप रद्द होणार? भारत स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता, BCCI लवकरच घेणार निर्णय

BCCI to pull out of Asia Cup

BCCI to pull out of Asia Cup | भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तान क्रिकेटला (Pakistan cricket) एकाकी पाडण्याच्या दिशेने मोठे पाऊल उचलले आहे. बीसीसीआयने आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आयोजित केलेल्या सर्व स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

रिपोर्टनुसार, बीसीसीआयने एसीसीला त्यांच्या निर्णयाची माहिती दिली आहे. त्यानुसार, पुढील महिन्यात श्रीलंकेत होणाऱ्या महिलांच्या इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून आणि सप्टेंबरमध्ये भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया कपमधूनहीभारत माघार घेणार आहे.

या निर्णयामागील एक महत्त्वाचे कारण म्हणजे एसीसीचे अध्यक्षपद सध्या मोहसिन नक्वी यांच्याकडे आहे. नक्वी हे केवळ पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्षच नव्हे, तर पाकिस्तान सरकारमधील मंत्री देखील आहेत.

“ज्या एसीसीचा प्रमुख पाकिस्तानचा मंत्री आहे, त्या संस्थेने आयोजित केलेल्या स्पर्धेत भारतीय संघ खेळू शकत नाही. ही देशाची भावना आहे. आगामी महिलांच्या इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेण्याबाबत आम्ही एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील आमचा सहभागही थांबवण्यात आला आहे. आम्ही भारत सरकारसोबत सतत संपर्कात आहोत,” असे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत ‘द इंडियन एक्सप्रेस’ने वृत्त दिले आहे.

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे आशिया कप स्पर्धेवरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे . यंदा या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आहे. 2024 मध्ये, सोनी पिक्चर्स नेटवर्क्स इंडियाने पुढील आठ वर्षांसाठी आशिया कपच्या मीडिया हक्कांसाठी 170 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचा करार केला आहे. जर ही स्पर्धा रद्द झाली, तर सोनीला या करारावर पुनर्विचार करावा लागेल.

आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानचा मुद्दा पहिल्यांदाच आला नाही. 2023 मध्ये, बीसीसीआयने भारतीय संघाला पाकिस्तानला पाठवण्यास नकार दिला होता आणि त्यामुळे भारताच्या सर्व सामन्यांसाठी तटस्थ ठिकाण म्हणून श्रीलंकेची निवड करण्यात आली होती. यावर्षीच्या सुरुवातीला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीही याच हायब्रिड मॉडेलचा अवलंब करण्यात आला होता.