इंग्लंडविरुद्ध दौऱ्यासाठी युवा संघ! गिल कर्णधार! करुण नायरला संधी


मुंबई- पाच कसोटी सामन्यांच्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा आज करण्यात आली. या मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व सलामीवीर शुभमन गिलकडे देण्यात आले आहे. यष्टीरक्षक ऋषभ पंतवर उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. करुण नायर तब्बल आठ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
मुंबईत आज झालेल्या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी आज ही घोषणा केली. 20 जूनपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी एकूण 18 जणांची निवड करण्यात आली आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर संघाचे कर्णधारपद कोण सांभाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर शुभमन गिलकडे संघाची धुरा सोपवण्यात आली आहे. 25 वर्षे 258 दिवसांचे वय असलेला शुभमन कसोटी क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्व करणारा पाचवा सर्वात तरुण क्रिकेटपटू ठरला आहे. उपकर्णधारपदाची माळ यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या गळ्यात पडली आहे. त्याच्यासह ध्रुव जुरेल हा संघातला दुसरा यष्टीरक्षक असेल.
अनुभवी के. एल. राहुलव्यतिरिक्त यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, साई सुदर्शन आणि पान 1 वरून
करुण नायर याला फलंदाज म्हणून स्थान मिळाले आहे. साई सुदर्शनने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा ठोकल्या आहेत. तो कोहलीच्या अनुपस्थितीत क्रमांक चारच्या फलंदाजाची भूमिका बजावू शकेल. विशेष म्हणजे, इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यासाठी त्याला आधीच इंडिया अ संघात स्थान देण्यात आले आहे.
वेगवान गोलंदाजांच्या यादीतून मोहम्मद शमीला वगळण्यात आले आहे, तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप आणि अर्शदीप सिंग यांना संघात स्थान मिळाले आहे. शार्दुल ठाकूरचेही संघात अनपेक्षित पुनरागमन झाले आहे. फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर संघात आहेत. जडेजा अष्टपैलू खेळाडूची कामगिरी बजावेल.
असा आहे भारतीय संघ
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार आणि यष्टीरक्षक),यशस्वी जयस्वाल, के.एल.राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यू इश्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, अर्शदीप सिंह आणि कुलदीप यादव.
करुण नायरचे 8 वर्षांनी पुनरागमन
कसोटी क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावूनही करुण नायरला 2017 नंतर संघात स्थान मिळाले नव्हते. दीर्घकाळच्या प्रतीक्षेनंतर त्याला पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. करुणने रणजी स्पर्धेच्या गेल्या हंगामात त्याने 9 सामन्यांमध्ये 4 शतकांसह 863 धावा केल्या होत्या. तर विजय हजारे चषकाच्या 8 डावांमध्ये 5 शतकांसह 779 धावा केल्या होत्या. या विदर्भाकडून खेळताना त्याने संघाला रणजी ट्रॉफीमध्ये विजय आणि विजय हजारे ट्रॉफीमध्ये दुसरे स्थान मिळवून दिले होते. या कामगिरीने त्याने निवड समितीला आपली नोंद घ्यायला लावली. करुणला आधीच इंग्लंड विरुद्ध मालिकेसाठी भारत अ संघात समाविष्ट करण्यात आले आहे.