कोची – केरळमधील समुद्रकिनाऱ्याजवळ लायबेरियाचे मालवाहू जहाज किनाऱ्यापासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर कलंडले. त्यातील २४ कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले आहे.
एमएससी ईएलएसए ३ हे जहाज २३ मे रोजी विझिंजम बंदरातून निघाले होते. ते कोचीला येत होते. काल दुपारी दीड वाजताच्या सुमारास जहाजाच्या मालकीच्या कंपनीने भारतीय अधिकाऱ्यांना कळवले की त्यांचे जहाज २६ अंशांनी कलंडले आहे. या जहाजाने तत्काळ मदत मागितली होती. त्यातील एक कंटेनर समुद्रात पडला होता.
भारतीय नौदलाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी बचाव कार्य सुरू केले. यामध्ये जहाजावरील सर्व २४ जणांना सुरक्षितपणे वाचवले. यापैकी २१ जणांना भारतीय तटरक्षक दलाने वाचवले तर ३ जणांना आयएनएस सुजाताने वाचवले. भारतीय तटरक्षक दलाने माहिती दिली की, जहाजावर भरलेले अनेक कंटेनर समुद्रात पडले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान होण्याची शक्यता आहे.