अहिल्यानगर – डाव्या चळवळीच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणाऱ्या ऐक्य परिषदेच्या माध्यमातून लाल निशाण पक्षाचा विलय भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी-लेनिनवादी) लिबरेशनमध्ये होणार आहे. ३१ मे रोजी अहिल्यानगरच्या श्रीरामपूर येथील गोविंदराव आदिक नाट्यगृहात हा ऐतिहासिक सोहळा पार पडणार आहे. यावेळी देशभरातील डावे नेते, कार्यकर्ते आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. याच दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती चौंडी येथे राष्ट्रपती दौप्रदी मुर्मू यांच्या उपस्थितीत साजरी होणार आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील या दोन्ही कार्यक्रमांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
१९४२ च्या चलेजाव आंदोलनात कम्युनिस्ट पक्षाच्या भूमिकेला विरोध करत लाल निशाण पक्षाची स्थापना झाली होती. एस. के. लिमये, यशवंत चव्हाण आणि भाऊ फाटक यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र डाव्या विचारसरणीचा पाया घालण्यात आला. नवजीवन संघटना आणि कामगार-किसान पक्षाच्या माध्यमातून या चळवळीने विविध सामाजिक प्रश्नांवर लढे उभारले. गेल्या सात दशकांत लाल निशाण पक्षाने महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, दलित, महिला आणि आदिवासी चळवळींमध्ये सक्रीय भूमिका बजावली.
गिरणी कामगारांचे लढे, साखर कारखान्यांतील भ्रष्टाचारविरोधी आंदोलन, ऊसतोड मजुरांचे प्रश्न, जलसंपत्ती आणि पुनर्वसनासारखे मुद्दे प्रभावीपणे मांडले. दुसरीकडे भाकप (माले) लिबरेशनने बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम आणि केरळमध्ये विविध लोकचळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला. २०१४ नंतर फॅसिस्ट प्रवृत्तींना रोखण्यासाठी इंडिया आघाडीसह अनेक लोकशाही मंचांवर त्यांनी संघर्ष उभारला आहे.
सध्या पक्षाचे दोन खासदार आणि बारा आमदार असून, अनेक राज्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्यांचे प्रतिनिधित्व आहे. या पार्श्वभूमीवर, लाल निशाण पक्ष व भाकप लिबरेशन या दोन पक्षांचा एकत्र येण्याचा निर्णय डाव्या चळवळीच्या नव्या पर्वाची नांदी मानली जात आहे.