‘तो’ फोटो शेअर करणे पडले महागात, लालू प्रसाद यादवांनी थेट मुलाचीच पक्षातून केली हकालपट्टी

Tej Pratap Yadav Expel From RJD

Tej Pratap Yadav Expel From RJD | राष्ट्रीय जनता दलाचे (RJD) प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांनी त्यांचा मुलगा तेज प्रताप यादवची (Tej Pratap Yadav) सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच, कुटुंबातून देखील बेदखल करण्यात आले आहे.

तेज प्रतापचे भाऊ तेजस्वी यादव (Tejashwi Yadav) आणि बहीण रोहिणी आचार्य यादव यांनीही वडिलांच्या निर्णयाला दुजोरा दिला आहे. तेज प्रतापने सर्व मर्यादा ओलांडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तेज प्रताप यादवने अनुष्का यादवसोबतच्या नात्याची सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. त्याने दोघांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. नंतर त्याने आपले खाते हॅक झाल्याचा दावा केला, पण तोपर्यंत हा फोटो व्हायरल झाला होते. लालू यादव यांनी एक्स (X) वर आपला निर्णय जाहीर करताना तेज प्रतापच्या वर्तनाला बेजबाबदार म्हटले.

तेजस्वी यादव यांनी या निर्णयावर आपली पहिली प्रतिक्रिया देताना म्हटले की, ते अशा प्रकारचे वर्तन सहन करत नाहीत. “जिथेपर्यंत माझा प्रश्न आहे, मला हे सर्व आवडत नाही आणि मी ते सहनही करत नाही. वैयक्तिक जीवन वेगळे असले पाहिजे. तो मोठा आहे आणि त्याला स्वतःचे निर्णय घेण्याचा अधिकार आहे. पण लालूजींनीही ट्विटद्वारे आपले विचार स्पष्ट केले आहेत. त्यांनी जे योग्य वाटले ते केले. मला हे माध्यमांद्वारेच कळले,” असे तेजस्वी यादव पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

लालू यांची मुलगी रोहिणी आचार्य यादव यांनी म्हटले आहे की, जे लोक आपल्या संस्कारांचा आणि कुटुंबाच्या परंपरांचा आदर करतात त्यांच्यावर कधीही प्रश्न उपस्थित केले जात नाहीत. “जे लोक वारंवार सभ्यतेच्या आणि कुटुंबाच्या प्रतिष्ठेच्या मर्यादा ओलांडतात, ते स्वतःला टीकेचे लक्ष्य बनवतात,” असे त्यांनी एक्सवर लिहिले.

“आमचे कुटुंब आमचा अभिमान आहे आणि ते आमच्यासाठी मंदिरासारखे आहे, तर आमचे वडील देवासारखे आहेत. सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर आधारित आमच्या वडिलांनी बांधलेला पक्ष आमची उपासना आहे. कोणामुळेही या तिघांची प्रतिष्ठा मलिन झालेली आम्ही कधीही स्वीकारू शकत नाही,” असे त्यांनी पुढे लिहिले.

आपल्या मोठ्या मुलाला पक्षातून काढताना बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले की, वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो, तेज प्रतापचे वर्तन कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांशी सुसंगत नव्हते.

“वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्याने सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाची कृत्ये, सार्वजनिक वर्तन आणि बेजबाबदार वर्तन आमच्या कौटुंबिक मूल्ये आणि परंपरांशी सुसंगत नाहीत. त्यामुळे, वरील परिस्थितीमुळे, मी त्याला पक्ष आणि कुटुंबातून काढून टाकत आहे. यापुढे त्याची पक्ष आणि कुटुंबात कोणतीही भूमिका राहणार नाही. त्याची 6 वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात येत आहे,” असे लालू यादव यांनी एक्सवर लिहिले.

तेज प्रतापने सोशल मीडियावर आपले नाते जाहीर केल्याचा इन्कार केला आणि आपले खाते हॅक झाल्याचा दावा केला. आपले आणि आपल्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी फोटो एडिट केले गेले आहेत, असेही त्याने म्हटले. तेज प्रताप यादवच्या फेसबुक (Facebook) खात्यावरील एका पोस्टमध्ये त्याने आणि अनुष्का यादवचे गेल्या १२ वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याचे म्हटले होते.

“माझे सोशल मीडिया अकाउंट हॅक झाले आहेत. मला आणि माझ्या कुटुंबाला त्रास देण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी माझे फोटो एडिट केले जात आहेत. माझ्या हितचिंतकांना आणि अनुयायांना सावध राहण्याचे आणि कोणत्याही अफवांकडे लक्ष न देण्याचे आवाहन करतो,” असे तेज प्रतापने फोटो व्हायरल झाल्यानंतर पोस्टमध्ये लिहिले होते.