NCP MLAs in Nagaland join CM Neiphiu Rio-led NDPP | अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व सात आमदार सत्ताधारी नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीत (NDPP) औपचारिकपणे सामील झाले. यामुळे मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या नेतृत्वातील एनडीपीपीला 60 सदस्यांच्या विधानसभेत पूर्ण बहुमत मिळाले आहे, आणि एनडीपीपीचे संख्याबळ 25 वरून थेट 32 वर पोहोचले आहे.
विधानसभा अध्यक्ष शारिंगैन लोंगकुमेर यांनी या विलिनीकरणाला मान्यता दिली असून संविधानाच्या दहाव्या अनुसूचीतील सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याचे स्पष्ट केले आहे. सातही आमदारांनी स्वतः उपस्थित राहून NDPP मध्ये सामील होण्याची औपचारिक पत्रे सादर केली होती. या प्रक्रियेनंतर आता नागालँड विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार उरलेला नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यावर नागालँड युनिटने अजित पवार यांना पाठिंबा दिला होता. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. मात्र, आता सर्व आमदारांनी सत्ताधारी पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतल्याने नागालँडमधील पक्षाची संपूर्ण अस्तित्व संपुष्टात आले आहे.
राज्य सरकारचे प्रवक्ते के.जी. केन्ये यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “मुख्यमंत्री नेफ्यू रिओ यांच्या विकास कामांमुळे आणि नेतृत्वामुळेच सातही आमदारांनी NDPPमध्ये येण्याचा निर्णय घेतला. या सहभागामुळे रिओ यांचं सरकार आणखी मजबूत होईल.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत या आमदारांवर कारवाई कशी करता येईल, याबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. “या आमदारांनी निवडणुकीत जनतेने दिलेल्या जनादेशाचा अपमान केला आहे. आम्ही लवकरच त्यांच्या भूमिकेवर चर्चा करू, आणि कायदेशीर व राजकीय लढाई लढू,” असं श्रीवास्तव म्हणाले.
या घडामोडीमुळे नागालँडमधील सत्ताधारी आघाडीतील गणितंही बदलली आहेत. NDPP आणि भाजपच्या एकत्रित संख्याबळाशिवाय NDPPकडेच आता स्पष्ट बहुमत असून, भाजपच्या पाठिंब्याची आवश्यकता उरलेली नाही. राज्यात NDPPचे 32, भाजपचे 12, तर अन्य लहान पक्षांचे व अपक्षांचे मिळून उर्वरित आमदार आहेत.