सैन्यदलाची बदनामीचंदू चव्हाणवर गुन्हा

नाशिक – भारतीय सैन्यदलातील बडतर्फ जवान चंदू चव्हाणने समाजमाध्यमांवर सैन्यदल आणि वरिष्ठ अधिकार्‍यांविरोधात खोटे आरोप करत बदनामीकारक वक्तव्ये केली होती. या प्रकरणी आता त्याच्यावर नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आर्टिलरी वर्कशॉपचे नायब सुभेदार सचिन गंगाधर गुंजाळ (38) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, चव्हाण याने 26 जून 2024 पासून आजपर्यंत विविध समाजमाध्यमांवर व्हिडिओ टाकून सैन्यदलाची बदनामी केली, वरिष्ठ अधिकार्‍यांवर खोटे आरोप करत जवानांना बंड करण्यास प्रवृत्त केले आणि गणवेश परिधान करून जनतेत गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला. बडतर्फ केल्यानंतर सैन्यातील जवानांना गणवेश परिधान करण्यास मनाई असते. तरीही चंदू गणवेश परिधान करून स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवत आहे. त्याद्वारे सैन्यातील भरतीपासून दूर राहावे, असे पालक आणि मुलांना सांगत आहे. बडतर्फ जवानांनी संघटना तयार करावी असेही आवाहन त्याने केले आहे. न्यायालयीन मार्ग उपलब्ध असतानाही त्याने जनतेमध्ये चुकीची माहिती पसरवून सैन्यदलाचे नुकसान केले आहे.

29 सप्टेंबर 2016 रोजी सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेल्या चंदू चव्हाण यांना काही दिवसांनंतर पाकिस्तानने भारताच्या सुपुर्द केले होते. त्यानंतर त्यांना भारतीय सैन्यातून निलंबित करण्यात आले होते.