‘आत्मनिर्भर भारत’ला बळकटी! ‘राफेल’च्या काही भागांची निर्मिती आता देशातच होणार, संरक्षण क्षमता वाढणार

Rafale fighter aircraft's main body to be soon made in India

Rafale fighter aircraft’s main body to be soon made in India | राफेल या लढाऊ विमानाच्या काही महत्त्वपूर्ण भागांचे उत्पादन आता भारतातच केले जाणार आहे. टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स आणि डसॉल्ट एव्हिएशन यांनी राफेल लढाऊ विमानाच्या (Rafale Fighter Jet) संरचनेतील मुख्य भाग म्हणजे फ्युसलाज (विमानाचे इंजिन-पंखसोडून उर्वरित भाग) भारतात तयार करण्यासाठी चार महत्त्वपूर्ण उत्पादन हस्तांतरण करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. यामुळे राफेलचा फ्युसलाज प्रथमच फ्रान्सबाहेर (France) तयार होणार आहे.

डसॉल्टच्या मते, हा टप्पा भारताच्या एरोस्पेस पायाभूत सुविधा क्षेत्रात मोठी गुंतवणूक दर्शवतो आणि उच्च-परिशुद्धता उत्पादनक्षेत्रात भारताला महत्त्वाचे स्थान मिळवून देणारा ठरेल.

या भागीदारीअंतर्गत, टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स हैदराबादमध्ये अत्याधुनिक उत्पादन सुविधा निर्माण करणार आहे. येथे राफेल विमानाचे मागचे कवच, मध्यवर्ती फ्युसलाज आणि पुढील भाग तयार केले जातील. या सुविधेतून FY2028 पर्यंत पहिले फ्युसलाज (विमानाचा मुख्य भाग) बाहेर पडण्याची अपेक्षा आहे. यानंतर दरमहा दोन पूर्ण फ्युसलाज तयार केले जातील.

डसॉल्ट एव्हिएशनचे सीईओ एरिक ट्रॅपियर म्हणाले की, “भारतामधील आमच्या पुरवठा साखळीचे बळकट होणे, हा एक निर्णायक टप्पा आहे. टाटांसोबतचा विस्तार आमच्या दर्जात्मक आणि स्पर्धात्मक गरजांनुसार उभा राहणार आहे.”

टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्सचे सीईओ सुकरण सिंह म्हणाले, “राफेल फ्युसलाजचे उत्पादन भारतात होणे म्हणजे डसॉल्ट एव्हिएशनच्या आमच्यावरील विश्वासाचे आणि भारतीय उत्पादन इकोसिस्टमच्या बळाचे प्रतीक आहे.”

फ्युसलाज म्हणजे काय?

फ्युसलाज म्हणजे विमानाचे मुख्य शरीर (Body of the Aircraft) जे सर्व भागांना जोडते. ही लांबट पोकळ रचना असून ती प्रवासी, माल, इंधन आणि कॉकपिटला स्थान देते. यात विमानाचे इंजिन, पंख व मागील भाग सोडून उर्वरित गोष्टींचा समावेश असतो. विमानाचा मुख्य भाग सुपरसॉनिक लढाऊ विमानात फ्युसलाज अधिक सुव्यवस्थित असते जेणेकरून वेगात कमी ड्रॅग (Drag) निर्माण होईल. प्रवासी विमानांमध्ये हे अधिक रुंद असते, जे अधिक प्रवासी आणि माल वाहून नेण्यासाठी उपयुक्त असते.