इम्तियाज जलीलांचा आरोप
छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगर येथील विट्स हॉटेल प्रकरणी वादात नाव सापडल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्यावर नवा आरोप झाला आहे. शिरसाट यांनी नियम डावलून शेंद्रा एमआयडीसीमध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावावर सहा कोटी रुपयांची जमीन घेतल्याचा आरोप एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे.
इम्तियाज जलील म्हणाले की, शिरसाट यांनी आपल्या मंत्रिपदाचा फायदा उचलून नियम डावलत शेंद्रा एमआयडीसीमध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट यांच्या नावावर ६,०९, ४ २,००० रुपयांमध्ये ही जमीन घेतली. ही जागा ट्रक टर्मिनलसाठी राखीव होती. पण एमआयडीसीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना जागेवरील हे आरक्षण काढण्यासाठी प्रस्ताव पाठवला. मग त्यावरील आरक्षण काढून ऑगस्टमध्ये शिरसाट यांना जमीन देण्यात आली. ही जागा २१ हजार २७५ स्क्वेअर मीटर इतकी सिद्धांत शिरसाट यांच्या कॅमिओ डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेडला देण्यात आली आहे. या कंपनीचे सिद्धांत शिरसाट, अमिन भावे आणि संजय शिरसाट यांच्या पत्नी असे तीन संचालक होते. यातील भावे हे मोठे बिल्डर आहेत. या कंपनीला जागा मंजूर करण्यात आल्यावर त्यांनी नोव्हेंबर २०२३मध्ये संचालक पदाचा राजीनामा दिला. हा प्रकल्प १०५ कोटी ८९ लाख रुपयांचा आहे. यासाठी २६.४७ कोटी रुपये सिध्दांत भरणार असल्याचा कागदोपत्री उल्लेख आहे. तर उर्वरित ७९.४२ कोटी रुपये कर्जरूपाने उचलणार असल्याचा उल्लेख आहे. विजया शिरसाट या गृहिणी आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी आपले उत्पन्न बांधकाम व्यवसायआणि शेतीअसे दाखवले आहे. एक लोकप्रतिनिधी असताना ते बिल्डरशिप करतात. शिरसाटांच्या पत्नीचे २५ लाख वार्षिक उत्पन्न असताना युको बँकेने त्यांना ५ कोटी ६५ लाख ३३० हजार कर्ज दिले आहे. त्यांच्या नावे सिक्युअर लोन १२ कोटी ५६ लाख ५३ हजार इतके आहे.
या प्रकरणाचे आपल्याकडे सर्व पुरावे आहेत. मंत्री संजय शिरसाट यांनी त्या जागेवर शाळा बांधवी. या प्रकरणी आपण एमआयडीसी प्रशासन, सीआयडी, ईडी, आयकर विभाग, मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे जलील म्हणाले. हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी सीबीआयकडे चौकशीसाठी द्यावे , अशी मागणीही त्यांनी केली.