रोहित-विराट पाठोपाठ ‘या’ भारतीय क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती, 2011 विश्वचषक विजेत्या संघाचा होता सदस्य

Piyush Chawla Retirement

Piyush Chawla Retirement | भारतीय क्रिकेट (Indian Cricket) वर्तुळात गेल्या काही महिन्यांपासून निवृत्तीची चर्चा सुरू असतानाच, आता भारताचा माजी लेगस्पिनर पियुष चावला (Piyush Chawla) याने देखील आपल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. 36 वर्षांचा चावला याने भारतासाठी 3 टेस्ट, 25 वनडे (ODI) आणि 7 टी-20 (T20I) सामने खेळले आहेत. त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2012 मध्ये श्रीलंकेत झालेल्या T20 विश्वचषकात खेळला होता

देशांतर्गत क्रिकेटमधील त्याची शेवटची स्पर्धा 2024-25 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी होती. 2025 IPL मध्ये पुनरागमनाच्या आशेने तो मैदानात उतरला होता, पण नोव्हेंबर 2024 च्या मेगा लिलावात त्याला कोणत्याही संघाने विकत घेतले नाही.

IPL मध्ये चावलाची ठसा उमटवणारी कामगिरी

पियुष चावलाने एकूण 192 IPL सामने खेळले आणि त्यात 192 बळी घेतले. त्याने पंजाब किंग्ज (PBKS), कोलकाता नाइट रायडर्स (KKR), चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांसारख्या प्रमुख संघांसाठी सामने खेळले. 2014 साली KKR कडून फायनलमध्ये निर्णायक फलंदाजी करत त्याने संघाला विजेतेपद मिळवून दिलं होतं. IPL मध्ये तो आतापर्यंतचा चौथा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरतो.

करिअरची सुरुवात आणि आंतरराष्ट्रीय वाटचाल

2005 मध्ये वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी चावला चॅलेंजर ट्रॉफी (Challenger Trophy) मध्ये सर्वात प्रथम चर्चेत आला होता. त्याने सचिन तेंडुलकरला गुगलीवर बाद केले होते. त्यानंतर 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध मोहाली येथे कसोटी पदार्पण केलं. 2007 च्या T20 World Cup, 2008 च्या ऑस्ट्रेलियातील त्रिकोणीय मालिका, आणि 2011 च्या ODI World Cup विजेत्या भारतीय संघात त्याचा समावेश होता. उत्तर प्रदेश आणि गुजरातकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळताना त्याने 137 सामन्यात 446 बळी घेतले.