इलॉन मस्क अमेरिका सोडणार? ट्रम्प यांच्यासोबतच्या वादानंतर रशियाने दिली ‘ही’ खास ऑफर

Donald Trump Elon Musk Feud

Donald Trump Elon Musk Feud | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि अब्जाधीश इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यातील जाहीर वाद दिवसेंदिवस वाढत असताना, आता रशियाने या वादात उडी घेतली आहे. रशियाचे वरिष्ठ अधिकारी दिमित्री मेदवेदेव यांनी या दोघांमध्ये शांतता करार घडवून आणण्याची ऑफर दिली आहे. मेदवेदेव हे रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान आहेत.

“आम्ही डी (डोनाल्ड) आणि ई (इलॉन) यांच्यात वाजवी शुल्कात शांतता करार घडवून आणण्यास तयार आहोत आणि यासाठी स्टारलिंकचे शेअर्स देय म्हणून स्वीकारण्यास तयार आहोत,” अशी उपरोधिक पोस्ट मेदवेदेव यांनी ‘एक्स’ (X) वर केली. मेदवेदेवच्या या उपहासात्मक टिप्पणीला मस्क यांनी इमोजीद्वारे उत्तर दिले. याशिवाय, रशियाने मस्क यांना राजकीय आश्रय देण्याची देखील तयारी दर्शवली आहे.

सध्या मस्क आणि ट्रम्प यांच्या वादाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. आता रशियाकडून देखील यावर प्रतिक्रिया देण्यात आली.मेदवेदेव यांची ही पोस्ट ट्रम्प आणि मस्क यांच्यातील वाढत्या शाब्दिक युद्धावर भाष्य करणारी होती. मेदवेदेव हे रशियाच्या सुरक्षा परिषदेचे (उपप्रमुख आहेत आणि व्लादिमीर पुतिनचे जवळचे सहयोगी मानले जातात.

सध्याट्रम्प रशिया आणि युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र कर आणि खर्च विधेयकावरून मस्क आणि ट्रम्प यांच्यातच शाब्दिक वाद रंगल्याचे पाहायला मिळाले. मस्क यांनी व्हाईट हाऊसमधून बाहेर पडल्यानंतर ट्रम्प यांच्यावर जेफ्री एपस्टाईन प्रकरणाशी संबंधित असल्याचा आरोप करत हा वाद आणखी वाढवला.

तसेच, रशियाच्या आंतरराष्ट्रीय व्यवहार समितीचे पहिले उपप्रमुख दिमित्री नोविकोव (Dmitry Novikov) यांनी म्हटले आहे की, गरज पडल्यास रशिया मस्कला राजकीय आश्रय देण्यास तयार आहे. “मला वाटते की मस्क यांचा खेळ पूर्णपणे वेगळा आहे, त्यामुळे त्यांना कोणत्याही राजकीय आश्रयाची गरज भासणार नाही, परंतु जर गरज पडलीच, तर रशिया निश्चितपणे तो देऊ शकेल,” असे नोविकोव यांनी म्हटले आहे. त्यांची ही ऑफर चर्चेचा विषय ठरली आहे.