Vishwajit Rane Viral Video | गोव्याचे आरोग्यमंत्री (Goa Health Minister) विश्वजीत राणे (Vishwajit Rane) यांनी एका सरकारी रुग्णालयातील डॉक्टरला जागीच निलंबित केले होते. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विरोधकांकडून टीका केली जात आहे. आता राणे यांनी त्यांच्या निर्णयाचा जोरदार बचाव केला आहे.
संबंधित डॉक्टरने रुग्णाशी “अहंकारी वर्तन” केल्याचा आरोप राणे यांनी केला आहे. रुग्णाला उपचार नाकारल्यामुळे मी त्याच्या बाजूने उभे राहिलो, यासाठी माफी मागणार नाही, असे राणे यांनी ठामपणे सांगितले.
गोमेकॉमध्ये (Goa Medical College and Hospital) झालेल्या या घटनेचा व्हिडिओ काँग्रेसने (Congress) सोशल मीडियावर शेअर केला आहे.
नेमके काय घडले?
राणे यांनी बांबोळी येथील गोमेकॉला भेट दिली होती. यावेळी त्यांनी मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रुद्रेश कुर्तिकर यांना जाहीरपणे निलंबित करण्याचे आदेश दिले. एका ज्येष्ठ पत्रकार महिलेने तक्रार केली होती की, त्यांच्या सासूबाईंना गोमेकोच्या अपघात विभागात डॉक्टरने गैरव्यवहार केला. या तक्रारीनंतर राणे यांनी ही कारवाई केली.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये राणे डॉक्टरला फटकारताना दिसत आहेत, “तुम्ही तुमची जीभ आवरण्यास शिका, तुम्ही डॉक्टर आहात. मी सहसा माझा संयम गमावत नाही, पण तुम्हाला स्वतःला सुधारण्याची गरज आहे. तुम्ही कितीही मोठे असाल, रुग्णांशी व्यवस्थित वागावे लागते.”
व्हिडिओमध्ये राणे डॉ. पाटील यांना उद्देशून म्हणाले, “त्याच्या जागी दुसरा सीएमओ आणा, मी त्याच्या निलंबनाच्या फाईलवर सही करेन. मला त्याला तात्काळ निलंबित करायचे आहे. मी सहसा उद्धटपणे वागत नाही, पण हे मी सहन करू शकत नाही.”
राणे यांच्या भूमिकेचे समर्थन
पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, “आरोग्यमंत्री म्हणून मी हस्तक्षेप केला आणि माझी भाषा अधिक मोजकी असू शकली असती हे मी मान्य करतो. मी आत्मचिंतन किंवा टीकेपेक्षा मोठा नाही. मी ज्या प्रकारे संवाद साधला त्याची मी पूर्ण जबाबदारी घेतो आणि खात्री देतो की असा दृष्टिकोन पुन्हा वापरला जाणार नाही.”
“मात्र, ज्या रुग्णाला उपचार नाकारण्यात आले, त्याच्या बाजूने उभे राहिल्याबद्दल मी माफी मागणार नाही,” असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गोमेको (GMCH) हे गोव्यातील सर्वात मोठे सरकारी वैद्यकीय रुग्णालय आहे, जे गोवा तसेच महाराष्ट्रआणि कर्नाटकच्या (Karnataka) जवळच्या भागातून आलेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवते. राणे यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसने यावरून जोरदार टीका केली आहे.