मैतेयींच्या नेत्याला अटक मणिपूरमध्ये इंटरनेट बंद


इंफाळ – मणिपूरमध्ये मैतेयी समाजाच्या एका नेत्याला अटक केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने करण्यात आली. या नंतर काही अफवाही पसरवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर मणिपूरच्या ५ जिल्ह्यांमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

मैतेयी समाजाची संघटना असलेल्या अरामबाई तेंगोलच्या एका नेत्याला काल अटक करण्यात आली. त्यानंतर काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी जाळपोळ केली. पोलिसांनी या नेत्याचे नाव घोषित केले नसले तरी या नावांवरुन राज्यात अनेक अफवा पसरवण्यात आल्या. नेत्याची सुटका करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी क्वाकीतेल व उरिपोक या भागातील रस्त्यांवर टायर जाळले. मैतेयी समाजाच्या ज्या नेत्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर ऑक्टोबर २०२३ मध्ये एका पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येचा आरोप होता.
या नेत्याचे नाव कामगिनथांब गंगटे असल्याचा दावा केला जात आहे.

मणिपूरमध्ये हिंसाचार उफाळू नये व अफवांना प्रतिबंध व्हावा यासाठी इम्फाळ पश्चिम, इम्फाळ पूर्व, थौबल, काकचिंग व बिष्णुपूर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. सरकारने म्हटले आहे की, मोबाईल व समाजमाध्यमाद्वारे मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात येत आहेत. मैतैयी समाजाच्या पाच लोकांना अटक केल्याची अफवा पसरवण्यात आल्यानंतर काही भागात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी काही ठिकाणी संचारबंदीही घोषित केली आहे.