राज्यभरात मुसळधार पाऊस हिंजवडी आयटी पुन्हा जलमय

पुणे – पिंपरी-चिंचवडमधील आयटी हब हिंजवडी (hinjewadi)पुन्हा एकदा पावसात जलमय झाले. गेल्या शनिवारीही हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. काही ठिकाणी पावसाच्या (rain)पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे दुचाकी वाहून गेल्या होत्या. राज्यभरातही मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले.

काल रात्रीपासून सुरु असलेल्या पावसामुळे हिंजवडीतील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप प्राप्त झाले.यामुळे रात्री घरी परतताना कर्मचाऱ्यांना त्याचा फटका बसला. अनेक दुचाकी आणि चारचाकी पाण्यात अडकल्या होत्या. काही ठिकाणी गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. मुंढवा, खराडी, हडपसर, फुरसुंगी, कोंढवा, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी, सिंहगडरस्ता, कोथरूड, बावधन,औंध, बोपोडी, पाषाण या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पुण्यात २४ तासांत ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात जाऊन पावसाचा आढावा घेतला. अधिकाऱ्यांना आवश्यक त्या उपाययोजना करा अशा सूचना दिल्या.

सोलापुरातील अक्कलकोट तालुक्यातील आरळी गावातील पूल गेला वाहून गेला. आरळी – दर्शनाळ – मुस्ती या मार्गावरील वाहून गेल्याने ग्रामस्थांचे आंदोलन केले. मंठा तालुक्यातील गारठेकी गावात सुट्टीवर आलेल्या जवानाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. नाशिकमधील मनमाडमध्ये विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. बुलडाणा , खामगाव, शेगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मुसळधार स्वरुपाचा पाऊस कोसळला. सिंधुदुर्गच्या सह्याद्री पट्ट्यातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातील करडखेडला जाणाऱ्या रस्त्याचे तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले. कर्नाटक सीमेसह शेजारच्या लातूर जिल्ह्याला जोडणारा हा एकमेव मार्ग असल्याने वाहनधारकांना याच रस्त्यावरून प्रवास करावा लागला. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.