मुंबई – परिवहन मंत्री तथा एसटी (ST) महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याचे परिपत्रक नुकतेच एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ . माधव कुसेकर यांनी काढले असून पुढील काही दिवसांत हे प्रादेशिक विभाग स्वतंत्रपणे आपले कार्यालय सुरू करतील.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या म्हणजे एसटी महामंडळाच्या नियोजन व पणन खाते अंतर्गत कार्यरत असलेल्या विविध संनियंत्रण समित्यांचे कार्यालय ६ डिसेंबर २०१६ पासून बंद केले होते. परंतु परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) हे कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी तेथील महामंडळाच्या विकेंद्रीकरणाची संकल्पना उचलून धरली. त्यामुळे आकार व प्रशासकीय दृष्ट्या कर्नाटक महामंडळाच्या दुप्पट असणाऱ्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे देखील किमान पाच प्रादेशिक विभागात विभाजन करावे अशी संकल्पना त्यांनी मांडली. त्यानंतर नियंत्रण नियोजन आणि समन्वयाच्या हेतूने महामंळातंर्गत ५ प्रादेशिक विभाग करण्याचा निर्णय सरनाईक यांनी घेतला.
या निर्णयानुसार मुंबई , नाशिक, नागपूर, पुणे व अमरावती असे ५ प्रादेशिक विभाग करण्यात आले असून, प्रत्येक प्रादेशिक विभाग अंतर्गत कार्यरत विभाग व मुख्यालय निश्चित करण्यात आले आहे. प्रत्येक समितीसाठी आवश्यक तेवढ्या अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे. त्याचप्रमाणे त्या-त्या भागातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेळेत सेवा मिळण्यासाठी नियोजन केले जाणार आहे.