Israel Iran Conflict | इस्रायलने इराणच्या लष्करी आणि अणु ठिकाणांवर हवाई हल्ले केल्याने दोन्ही देशांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या हल्ल्यांमध्ये इस्रायलने इराणचे अनेक महत्त्वाचे लष्करी कमांडर आणि अणु कार्यक्रमांवर काम करणारे अणुवैज्ञानिक यांना ठार केले. त्यानंतर इराणकडून देखील इस्त्रायलच्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले जात आहेत.
त्यातच आता इस्रायलचे (Israel) पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना इराणने अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा दोनदा प्रयत्न केला असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
एका मुलाखतीमध्ये बोलताना बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इराणने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे, कारण इराण ट्रम्प यांना आपल्या अणुकार्यक्रमासाठी धोका मानतो.
इराणने त्यांच्याही हत्येचा प्रयत्न केल्याचे सांगत, बेंजामिन नेतन्याहू यांनी स्वतःला डोनाल्ड ट्रम्प यांचा “कनिष्ठ भागीदार” म्हटले. इराणविरुद्धच्या इस्रायलच्या कारवाईचे समर्थन करताना, नेतन्याहू म्हणाले की, जे अमेरिका नष्ट होवो अशा घोषणा देतात, ज्यांनी ट्रम्प यांच्या हत्येचे दोनदा प्रयत्न केले, बेरूतमध्ये 241 मरीन सैनिकांना ठार केले, आणि अफगाणिस्तानमध्ये हजारो अमेरिकन सैनिकांना मारले व जखमी केले, अशा देशांकडे अणुबॉम्ब असू नयेत.
ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न थेट इराणकडूनच झाला याबाबत गुप्तचर माहिती आहे का, असे विचारले असता, नेतन्याहू म्हणाले, “, त्यांच्या गुप्तचर यंत्रणेमार्फत त्यांना ट्रम्प यांना मारायचे आहे., असा दावा त्यांनी केला. तसेच, इराण ट्रम्प यांना आपला “शत्रू नंबर वन” मानतो आणि त्यांना मारू इच्छितो., असेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांचा मध्यस्थीचा दावा: ‘इराण आणि इस्रायलमध्ये लवकरच शांतता’
दरम्यान, याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, मध्य पूर्वेतील जुन्या शत्रूंमध्ये “लवकरच” शांतता प्रस्थापित होईल. भारत आणि पाकिस्तानयांच्यातीललष्करी संघर्षानंतर आपण युद्धविराम घडवून आणल्याचा आपला दावा पुन्हा करत, ट्रम्प म्हणाले की इस्रायल आणि इराणने करार केला पाहिजे. त्यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ज्या देशांमध्ये लष्करी संघर्ष झाले होते, त्याची उदाहरणे दिली.
“इराण आणि इस्रायलने करार केला पाहिजे, आणि करतीलच, जसे मी भारत आणि पाकिस्तानमध्ये घडवून आणले. तसेच, माझ्या पहिल्या कार्यकाळात सर्बिया आणि कोसोवोमध्येअनेक दशकांपासून सुरू असलेला तीव्र संघर्ष युद्धाचे स्वरूप घेण्यास तयार होते. मी तो थांबवला (बायडेनने काही अतिशय मूर्ख निर्णयांनी दीर्घकालीन शक्यतांना नुकसान पोहोचवले आहे, परंतु मी ते पुन्हा दुरुस्त करेन),” असे त्यांनी ‘ट्रूथ सोशल’वर लिहिले.
“आणखी एक प्रकरण म्हणजे इजिप्त आणि इथिओपिया, त्यांची एका मोठ्या धरणावरून असलेली लढाई, ज्याचा नाईल नदीवर परिणाम होत आहे. माझ्या हस्तक्षेपामुळे किमान सध्या तरी शांतता आहे आणि ती तशीच राहील. त्याचप्रमाणे, इस्रायल आणि इराणमध्ये लवकरच शांतता असेल! अनेक कॉल्स आणि बैठका आता होत आहेत. मी खूप काही करतो, आणि मला कधीही श्रेय मिळत नाही, पण ठीक आहे, लोकांना समजते. मध्य पूर्वेला पुन्हा महान बनवा,” असे ते म्हणाले.