‘मोनालिसा’चे पेटिंग ठेवलेले जगातील सर्वात प्रसिद्ध म्युझियम अचानक बंद, कारण काय?

Louvre Museum Shuts down

Louvre Museum Shuts down | जगातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या लुव्र म्युझियम (Louvre Museum) अचानक बंद करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने येथील संपूर्ण कामकाज ठप्प झाले. पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे निर्माण झालेल्या असह्य कामकाजाच्या परिस्थितीला कंटाळून कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला.

प्रसिद्ध पेटिंग मोना लिसा आणि इतर अमूल्य कलाकृती पाहण्यासाठी हजारो नागरिक पॅरिसमधील या म्यूझिमला भेट देतात. मात्र, पर्यटकांच्या प्रचंड गर्दीमुळे कर्मचाऱ्यांवर ताण पडत असल्याचे पाहायला मिळाले. अखेर कामाच्या परिस्थितीमुळे लुव्र म्युझियममधील गॅलरी कर्मचारी, तिकीट एजंट आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी संप करण्याचा निर्णय घेतला.

त्यांनी सांगितले की, सध्याची कामाची परिस्थिती शारीरिक आणि मानसिक ताण निर्माण करणारी आहे. गेल्या वर्षी 8.7 दशलक्ष पर्यटकांनी भेट दिलेल्या या म्युझियमला अपुऱ्या सुविधा, मर्यादित विश्राम जागा आणि जुनी पायाभूत सुविधा यांसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

लुव्रच्या अध्यक्षा लॉरेन्स डेस कार्स यांनीही म्युझियमच्या ढासळत्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, इमारतीचा काही भाग आता जलरोधक राहिलेला नाही, ज्यामुळे तापमानातील बदलांमुळे मोना लिसासारख्या अमूल्य कलाकृतींचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यांनी म्युझियममधील सध्याचा अनुभव कर्मचारी आणि पर्यटक दोघांसाठीही शारीरिक त्रासदायक असल्याचे म्हटले आहे.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी “लुव्र न्यू रेनेसान्स” नावाची 10 वर्षांची योजना जाहीर केली आहे. या योजनेत मोनालिसासाठी नवीन प्रवेशद्वार आणि इतर सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. दररोज सुमारे 20,000 पर्यटक मोनालिसा पेटिंग पाहण्यासाठी या म्यूझियमला भेट देतात.

लुव्र म्युझियम, जे जगातील सर्वात प्रतिष्ठित सांस्कृतिक स्थळांपैकी एक आहे. हजारो पर्यटक या म्युझियमला भेट देतात. मात्र, आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे हे म्युझियम तात्पुरते बंद करण्यात आले आहे.