सून तेजस्वीवर शिंदेंचा दबाव! विनोद घोसाळकर भावुक


मुंबई- मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व शिंदे गटाने उबाठातील माजी नगरसेवक आणि नेत्यांना फोडून आपल्या पक्षात सामील करून घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर उबाठाचे ज्येष्ठ उपनेते विनोद घोसाळकर यांनी आज उबाठाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेऊन आपल्या वेदना मांडल्या. ते म्हणाले की, माझी सून आणि उबाठाची माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर हिच्यावर दबाव टाकून आपल्या गोटात घेण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहेत. यावेळी हत्या झालेला आपला पुत्र अभिषेक यांच्या आठवणीने ते सद्गदित झाले.
तेजस्वी घोसाळकर यांनी स्थानिक नेतृत्वावरील नाराजीमुळे मे महिन्यात उबाठाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना तत्काळ मातोश्री निवासस्थानी भेटीसाठी बोलावले होते. या भेटीनंतर तेजस्वी म्हणाल्या होत्या की, मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच आहे. माझ्या समस्या मी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यासंदर्भात त्यांचे उत्तर मिळाले आहे. परंतु काही प्रश्न अजूनही आहेत. त्याबाबतचा निर्णय ते लवकरच कळवतील. त्यावेळी तेजस्वी घोसाळकर उबाठा सोडणार, अशी जोरदार चर्चा सुरू होती. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिंदे गट आणि भाजपकडून जास्तीत जास्त माजी नगरसेवकांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार मोहीम राबवली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आतापर्यंत ठाकरेंशी एकनिष्ठ राहिलेल्या घोसाळकर कुटुंबातील सून तेजस्वी यांना आपल्या पक्षात आणण्यासाठी या दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत.
आज यासंदर्भात विनोद घोसाळकर यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत म्हणाले की, आत्ताच माझी आणि विनोद घोसाळकर यांची चर्चा झाली. ते शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसैनिक आहेत आणि सध्या उपनेते आहेत. त्यांच्या घरात दुर्दैवी प्रसंग घडला. त्यांनी आपला मुलगा गमावला. विनोद घोसाळकर यांच्या सूनबाई तेजस्वी घोसाळकर या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. मला भाजपा आणि शिंदे गटाच्या नेत्यांची लाज वाटते. ज्यांनी आपला पती गमावला, अशा मुलीला ते फोन करून आमच्या पक्षात या, असे म्हणतात. ज्यांनी आपला मुलगा गमावला, अशा घरात तुम्ही राजकारण करता? तिथे फोडाफोडीचे राजकारण करता? लाज वाटली पाहिजे. हे निर्दयी आणि निर्घृण लोक आहेत. आमचे प्रश्न आम्ही हाताळू. विनोद घोसाळकर आमच्यासोबत आहेत. त्यांच्या सूनबाई तेजस्वी घोसाळकरही आमच्याच पक्षात आहेत. राऊत यांनी अभिषेक घोसाळकर यांचा उल्लेख करताच मुलाच्या आठवणीने विनोद घोसाळकर भावुक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले की, अभिषेकचे नाव घेतले म्हणून माझे डोळे पाणावले. मी अजूनही उबाठा गटातच आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून माझी भूमिका जाहीर
करणार आहे.

Share:

More Posts