तेहरान,तेल अवीव – इस्रायल आणि इराणदरम्यानचा (Israel and Iran War) संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र चालला आहे. आज सलग सातव्या दिवशी दोन्ही देशांनी एकमेकांवर हवाई हल्ले (Air strikes) केले. इस्रायलने इराणच्या अरक आणि नतांझ येथील अणुकेंद्रांवर क्षेपणास्त्रे डागली. तर इराणने दक्षिण इस्रायलमधील एका मोठ्या सरकारी इस्पितळावर हल्ला केला. इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे १७६ जण जखमी झाले आहेत. तर २४ लोकांचा बळी गेला आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू (Israeli PM Benjamin Netanyahu) यांनी रुग्णालयावरील क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर इराणला इशारा दिला आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले आहे की, सोरोका रुग्णालयावरील क्षेपणास्त्र हल्ल्याची इराणला मोठी किंमत चुकती करावी लागेल.
मागील सात दिवसांत इस्रायलने केलेल्या शेकडो हल्ल्यांमध्ये ६३९ जणांचा बळी गेला आहे. तर तेराशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत, असा दावा वॉशिंग्टनस्थित (Washington) मानवाधिकार संघटनेने केला. प्रत्युत्तरादाखल इराणने केलेल्या हल्ल्यांमध्ये इस्रायलमध्ये २४ लोक मारले गेले आहेत. शेकडो लोक बैपत्ता झाले आहेत, असेही या संघटनेने सांगितले.
दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (US President Donald Trump) यांनी इराणला दिलेला शरणागती पत्करण्याचा सल्ला इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी फेटाळल्यानंतर ट्रम्प यांनी आपले पुढचे पाऊल काय असेल, याबाबत गुप्तता बाळगली आहे. पुढील आठवड्यात मी काहीतरी मोठे करणार आहे,असे म्हणत ट्रम्प यांनी जगाची चिंता वाढवली. मी कदाचित मोठी कृती करेन किंवा करणार नाही.मी काय करणार आहे हे कोणालाच माहीत नाही,असे बुचकाळ्यात टाकणारे विधान ट्रम्प यांनी केले आहे. इराणने आपल्याला संघर्ष थांबवण्यासाठी आपल्याला चर्चेचा प्रस्ताव दिला होता. पण तोवर वेळ निघून गेली होती,असा दावाही ट्रम्प यांनी केला
इस्राईलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू म्हणाले की, आम्ही एक एक पाऊल पुढे सरकत आहोत. इराणची अणु केंद्रे आम्ही उद्ध्वस्त केली आहेत. त्याचबरोबर क्षेपणास्त्रांची निर्मिती करणारी ठिकाणेही आम्ही उदेध्वस्त केली आहेत.या संघर्षात आम्हाला अमेरिकेने मदत केल्याबद्दल मी ट्रम्प यांचे आभार मानतो.