चेन्नई – सन टिव्ही नेटवर्क (SUN TV Network Limited) या कंपनीच्या मालकी हक्कांवरून मारन बंधुंमध्ये वाद निर्माण (SUN TV family fraudulent ) झाला आहे. तामिळनाडूतील शक्तिशाली राजकीय पक्ष द्रविड मुनेत्र कळघमचे (द्रमुक) खासदार, माजी केंद्रीय मंत्री दय़ानिधी मारन (Former Union minister Dayanidhi Maran) यांनी आपले थोरले बंधू कलानिधी मारन यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
कलानिधी मारन हे सन टिव्ही नेटवर्कचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. कंपनीवर कब्जा करण्यासाठी कलानिधी बेकायदेशीर मार्गांचा वापर करत आहेत, असा आरोप दयानिधी यांनी केला आहे. दयानिधी यांचा आरोप आहे की, २००३ मध्ये जेव्हा त्यांचे वडील माजी केंद्रीय मंत्री मुरासोली मारन कोमामध्ये असताना काही निकटवर्तीयांशी संगनमत करून कलानिधी यांनी कंपनीचे १२ लाख समभाग स्वतःच्या नावावर वळते करुन घेतले. या १२ लाख समभागांचा हिस्सा कलानिधी यांना मिळाल्याने ते रातोरात कंपनीचे ६० टक्के हिस्सेदार बनले. कलानिधी यांनी त्यावेळी ३ हजार रुपये प्रतिसमभाग बाजारभाव असताना अवघ्या १० रुपये प्रतिसमभाग दराने हे समभाग खरेदी केले. या गैरव्यवहारामुळे कंपनीचे ३,४९८.८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
