Madhya Pradesh 90 Degree Flyover | : मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ऐशबाग स्टेडियमजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने (पीडब्ल्यूडी) 18 कोटी रुपये खर्चून उभारलेला रेल्वे उड्डाणपूल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या पुलाला देण्यात आलेल्या 90 डिग्रीच्या वळणामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियावर या पुलाचे फोटो व्हायरल झाले होते. यावरून मध्य प्रदेश सरकारची खिल्ली देखील उडवण्यात आली. या विचित्र डिझाइनवरून सर्वत्र टीका होत असताना अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आता या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे.
हा पूल अद्याप वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. पीडब्ल्यूडीच्या मते, जमिनीच्या कमतरतेमुळे हे अनोखे डिझाइन स्वीकारण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) पथकाने केलेल्या चौकशीतही हेच कारण समोर आले आहे.
पीडब्ल्यूडी मंत्री राकेश सिंह यांनी सांगितले की, “सुरक्षित वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी आणि या समस्येवर मार्ग काढण्यासाठी आम्ही दोन मुख्य अभियंत्यांची समिती स्थापन केली आहे. ही समिती रेल्वे आणि इतर संबंधितांशी चर्चा करून सुधारणा सुचवेल.”
रेल्वेकडून जमिनीची अपेक्षा
पीडब्ल्यूडीने या दोषपूर्ण डिझाइनमध्ये सुधारणा करण्यासाठी रेल्वेकडे अतिरिक्त जमिनीची मागणी केली आहे. मात्र, रेल्वेचे प्रवक्ते नवल अग्रवाल यांनी सांगितले की, पीडब्ल्यूडीकडून अद्याप कोणताही अधिकृत प्रस्ताव आलेला नाही. “प्रस्ताव आल्यास आम्ही त्यावर विचार करू,” असे त्यांनी स्पष्ट केले. पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर थोडी अधिक जागा मिळाली, ब्रिजमध्ये बदल करता येईल. ज्यामुळे वाहतूक सुरक्षित आणि सुलभ होईल.
समितीच्या अहवालाकडे लक्ष
या समितीच्या अहवालानंतर पुलाच्या डिझाइनमध्ये कोणते बदल होतात आणि तो कधी वाहतुकीसाठी खुला होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या या पुलाच्या विचित्र डिझाइनमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये नाराजी आहे. तीक्ष्ण वळणामुळे अपघातांचा धोका वाढण्याचीही भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय, विचित्र डिझाइनमुळे सोशल मीडियावरही जोरदार चर्चा रंगली आहे.