अमेरिका युद्धात उतरली! इराणचे तीन अणुतळ उद्ध्वस्त! तुम्ही सुरुवात केली! आम्ही शेवट करू! इराण चवताळला

वॉशिंग्टन- इस्त्रायल-इराण यांच्यात तणाव वाढल्यापासून अमेरिका इराणवर हल्ला करेल, असा अंदाज गेले काही दिवस व्यक्त केला जात होता. मात्र, या युद्धात उतरण्याबाबत दोन आठवड्यांनी निर्णय घेऊ, असे अमेरिकेने कालच जाहीर केले होते. मात्र, आज भारतीय वेळेनुसार पहाटे साडेचार वाजता अमेरिकन बी-2 बॉम्बर विमाने इराणच्या हद्दीत प्रवेशली. या विमानांनी अमेरिकेच्या मिसुरी एअरबेसवरून 11,400 किलोमीटरचे अंतर पार करून सलग 37 तास प्रवास केला होता. त्यांनी इंधनही हवेतल्या हवेत भरले. या विमानांनी बंकर बस्टर बॉम्ब आणि टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी इराणच्या फोर्डो, नतान्झ आणि इस्फहान या आण्विक स्थळांवर हल्ला केला. या हल्ल्यात आण्विक तळांचे मोठे नुकसान झाल्याचा दावा अमेरिकेने केला. तर इराणने याचा इन्कार केला असून, या तळावरील अण्वस्त्र आधीच हलवल्याचे म्हटले आहे.

अमेरिकेने या कारवाईला ऑपरेशन मिडनाईट हॅमर असे नाव दिले होते. यात एकूण 125 लढाऊ विमाने सहभागी होती. त्यात 7 बी-2 बॉम्बर, फायटर जेट आणि इंधन भरण्यासाठी टँकर विमाने यांचा समावेश होता. प्रत्येक बी-2 विमानाने 30 हजार पौंडाचे बॉम्ब फेकले. दिशाभूल करण्यासाठी विमाने पॅसिफिक महासागरातून पाठविण्यात आली.
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील आपल्या अकाऊंटवरून लगेच एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, सर्व अमेरिकन विमाने इराणच्या हवाई हद्दीतून बाहेर पडली आहेत. फोर्डो नष्ट झाले आहे. त्यावर बॉम्बचा संपूर्ण पेलोड टाकण्यात आला आहे. सर्व विमाने सुरक्षितपणे परतत आहेत. आमच्या महान अमेरिकन योद्ध्यांचे अभिनंदन. जगात असे दुसरे कोणतेही सैन्य नाही जे हे करू शकले असते. आता शांततेची वेळ आली आहे.
ट्रम्प देशाला संबोधित करत असताना, त्यांच्या मागे उपाध्यक्ष जेडी व्हेन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि संरक्षण मंत्री पीट हेगसेथ उपस्थित होते. या हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायली पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यात चर्चा झाल्याचे व्हाईट हाऊसच्या अधिकार्‍यांनी म्हटले. या हल्ल्यानंतर नेतन्याहू यांनी ट्रम्प यांचे आभार मानले. नेतन्याहू म्हणाले की, अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार, तुम्ही इराणमधील अणुतळांवर हल्ला करण्यासाठी कठोर पाऊल उचलले आहे. यामुळे इतिहास बदलेल. इस्रायलने ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणवर अनेक प्रभावी हल्ले केले. परंतु अमेरिकेचा हल्ला ‘खरोखरच अतुलनीय’ होता. अमेरिकेने आज रात्री जे केले ते जगातील इतर कोणताही देश करू शकत नाही. इतिहास लक्षात ठेवेल की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जगातील सर्वात धोकादायक राजवटीला सर्वात धोकादायक शस्त्रास्त्रांपासून दूर ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलली.

इराणचे सर्वोच्च धार्मिक नेते अयातुल्ला खामेनी यांनी म्हटले आहे की, अमेरिकेने त्यांच्या अणुतळांवर हल्ला करून आंतरराष्ट्रीय कायद्याचे गंभीर उल्लंघन केले आहे. राजनैतिक चर्चा सुरू असताना हा हल्ला झाला. हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन आहे. इराण आपला अणु कार्यक्रम थांबवणार नाही. आम्ही अमेरिकेचा असा बदला घेऊ की, अमेरिका कधी विसरणार नाही.

खामेनी यांचे प्रतिनिधी हुसेन शरियतमदारी म्हणाले की, पहिली कारवाई म्हणून ते बाहरिनमधील अमेरिकन नौदलाच्या ताफ्यावर हल्ला करतील. होर्मुझचा सागरी मार्ग बंद करतील. अमेरिकन, ब्रिटिश, जर्मन आणि फ्रेंच जहाजांसाठी होर्मुझची सामुद्रधुनी बंद राहील.
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर हुथी बंडखोरांनी इराणच्या बाजूने युद्धात उतरण्याची घोषणा केली आहे. त्यांनी धमकी दिली आहे की, लाल समुद्रातून जाणार्या अमेरिकेच्या जहाजावर हल्ले करण्यात येतील.

ब्रिटनने अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला समर्थन दिले आहे. तर सौदी अरेबियाने इराणला संयम बालगण्यास सांगितले आहे. दोन दिवसांपूर्वी ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार द्यावा,अशी मागणी करणार्‍या पाकिस्तानने अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्ल्याचा निषेध केला आहे. हे हल्ले करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले आहे. इराणला स्वसंरक्षण करण्याचा हक्क आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक डार यांनी जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेने चिंता व्यक्त केली आहे. सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस म्हणाले की, इराणविरोधात बळाचा वापर हा चिंतेचा विषय आहे. हा आंतरराष्ट्रीय सुरेक्षासाठीही धोका आहे. परिस्थिती खूप धोकादायक बनली आहे. हे युद्ध वेगाने नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्या सामान्य लोकांवर, संपूर्ण प्रदेशावर आणि जगावर खूप वाईट परिणाम होईल. संकटाच्या या काळात, अराजकता आणि विनाशाची ही मालिका थांबवणे गरजेचे आहे. यावर कोणताही लष्करी उपाय नाही. पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे संवाद आणि शांतता हाच आहे.

या हल्ल्यानंतर इराणच्या आण्विक तळातून किरणोत्सर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु इराणच्या अणुऊर्जा संस्थेने म्हटले आहे की, अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही फोर्डो, नतान्झ आणि इस्फहानमध्ये रेडिएशन गळती झालेली नाही. या परिसराची तपासणी आणि रेडिएशन मापन यंत्रांमधून मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणांच्या आसपास राहणार्‍या लोकांना कोणताही धोका नाही. संयुक्त राष्ट्रांच्या अणु देखरेख संस्थेने सोमवारी आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा केली आहे. या संस्थेचे प्रमुख राफेल ग्रोसी यांनी ही माहिती दिली आहे.

अमेरिकेच्या हल्ल्यानंतर चवताळलेल्या इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. इस्रायलच्या दहा शहरांवर तीसहून अधिक क्षेपणास्त्रे डागण्यात आली. या शहरांत तेल अवीव, हैफ यांचा समावेश होता. इराणच्या हल्ल्यानंतर तेल अवीवमध्ये सायरन वाजू लागले. इस्रायलच्या सैन्याने असा दावा केला की, यातील आठ क्षेपणास्त्रे हवेत नष्ट करण्यात आली. इराणची दोन लढाऊ विमानही पाडण्यात आली. या हल्ल्यात अनेक इमारतींचे नुकसान झाले, तर वीसहून अधिक इस्रायली नागरिक जखमी झाले. तर इराणने असे म्हटले की, त्यांनी इस्रायलचे विमानतळ, एक जैविक संशोधन केंद्र, काही शस्त्रास्त्र केंद्रे आणि लष्करी कमांड तळांना लक्ष्य केले.

इस्रायलमध्ये रविवारपासून शाळा, कार्यालये, गर्दीची ठिकाणे वगळता सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांच्या मंजुरीनंतर आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. इराणमध्येही आणीबाणी जाहीर करण्यात आली. 7 जुलैपर्यंत इस्रायलमधील विमानसेवा बंद राहाणार आहे.


फोर्डोवर हल्ला का?
फोर्डो हा नातानझनंतर इराणचा दुसरा युरेनियम शुद्धीकरण प्रकल्प आहे. तो एका टेकडीवर 295 फूट खोल म्हणजेच सुमारे 90 मीटर अंतरावर जमिनीखाली आहे. त्यामुळे हवाई हल्ल्याद्वारेही तो सहजपणे नष्ट करता येऊ शकत नाही. फोर्डो तळापर्यंत पोहोचण्यासाठी पाच बोगदे बनवण्यात आले आहेत. खोलवर बंकरसारख्या सुविधा आहेत. या ठिकाणी नऊ अणुबॉम्ब बनवण्याइतके युरेनियम आहे. इस्रायलला बर्‍याच काळापासून या तळावर डोळा होता. मात्र, आतापर्यंत तो इस्रायली हल्ल्याच्या आवाक्याबाहेर होता.

मोदी- पेझेश्कियान संवाद

अमेरिकेचे इराणरील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून संवाद साधला. हा संवाद 45 मिनिटे चालला. पंतप्रधानांनी त्यांच्या अधिकृत एक्स खात्यावरून याची माहिती दिली. मोदी यांनी म्हटले आहे की, इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी झालेल्या संभाषणादरम्यान त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर चर्चा केली. मी तणाव कमी करण्याचे, संवाद आणि राजनैतिकतेला प्राधान्य देण्याचे त्यांना आवाहन केले. या प्रदेशात शांतता, सुरक्षा आणि स्थिरता लवकरात लवकर प्रस्थापित करण्याच्या गरजेवर भर दिला.

Share:

More Posts