‘महिलांनी भारतात एकट्याने प्रवास करू नये’, अमेरिकेने नागरिकांना दिल्या सूचना; कारण काय? 

US Travel Advisory

US Travel Advisory | अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने भारतातील अमेरिकन नागरिक आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रवास सूचना जारी केली आहे. आहे. या सूचनेत भारतात गुन्हेगारी, दहशतवाद आणि लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे “अधिक सावधगिरी” बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

विशेषतः महिलांना एकट्याने प्रवास टाळण्याचा आणि पर्यटन स्थळांवर सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. जम्मू-काश्मीर आणि नक्षलवाद प्रभावित भागात प्रवास न करण्याचा स्पष्ट सल्लाही देण्यात आला आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने त्यांच्या नागरिकांसाठी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी (प्रवास सूचना) जारी केली आहे.

या सूचनेत म्हटले आहे, “भारतात हिंसक गुन्हे, दहशतवादी हल्ले आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. बलात्कार हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा गुन्हा आहे.” अमेरिकन नागरिकांना पर्यटन स्थळे, वाहतूक केंद्रे, बाजारपेठा आणि सरकारी इमारतींना भेट देताना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे, कारण ही ठिकाणे दहशतवादी हल्ल्यांसाठी संवेदनशील आहेत. 2022 पासून भारत ‘लेव्हल 2’ श्रेणीत आहे, आणि यापूर्वी 2022, 2023 आणि 2024 मध्येही असेच इशारे देण्यात आले होते.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (उल्लेख करत अमेरिकेने जम्मू-काश्मीरमध्ये प्रवास न करण्याचा सल्ला दिला आहे. “दहशतवाद आणि नागरी अशांततेमुळे जम्मू-काश्मीर (पूर्व लडाख आणि लेह वगळता) प्रवासासाठी असुरक्षित आहे,” असे सूचनेत म्हटले आहे. श्रीनगर, गुलमर्ग आणि पहलगामसारख्या पर्यटन स्थळांवरही हिंसाचाराचा धोका आहे. भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ (LOC) हिंसक घटना सामान्य असून, परदेशी पर्यटकांना काही भागांत प्रवासाची परवानगी नाही. भारत-पाकिस्तानमधील संभाव्य सशस्त्र संघर्षाचाही इशारा देण्यात आला आहे.

नक्षलवादाचा धोका

अमेरिकेने नक्षलवाद प्रभावित भागांबाबतही चिंता व्यक्त केली आहे. “माओवादी अतिरेकी गट (नक्षलवादी) पूर्व महाराष्ट्र, उत्तर तेलंगणा, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, छत्तीसगड, मेघालय आणि ओडिशामध्ये सक्रिय आहेत,” असे सूचनेत नमूद आहे. या भागात हिंसक कारवायांचा धोका असल्याने अमेरिकन नागरिकांना सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे.

महिलांना एकट्याने प्रवास न करण्याचा आणि ग्रामीण भागात सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. “ग्रामीण भागात आपत्कालीन सेवा मर्यादित असतात,” असे सूचनेत म्हटले आहे. पर्यटन स्थळांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडल्याचा उल्लेख करत महिलांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे.

अमेरिकन नागरिकांना सॅटेलाइट फोन किंवा जीपीएस उपकरणे भारतात आणू नयेत, असा इशारा देण्यात आला आहे. “भारतात सॅटेलाइट फोन बाळगणे बेकायदेशीर आहे आणि $200,000 दंड किंवा तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो,” असे सूचनेत स्पष्ट केले आहे. प्रवास विमा घेण्याचा आणि प्रवास योजनांचा आढावा घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अमेरिकन नागरिकांना नेहमी सभोवतालच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.