मुंबई- महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग महामंडळाची (Maharashtra State Road Transport Corporation)९ श्वेतपत्रिका आज जाहीर झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Transport Minister Pratap Sarnaik) यांनी एसटीचे एकूण महसुली उत्पन्न, खर्च, कर्ज, आणि देयकाबाबतचा आढावा घेणारी श्वेतपत्रिका मांडली. त्याचबरोबर यावेळी श्वेतपत्रिकेत ४५ वर्षाचे अवलोकन करण्यात आले. या ४५ वर्षांपैकी फक्त ८ वर्षेच महामंडळाला काही प्रमाणात नफा झाला असून उर्वरित सर्व वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात तोटा झाल्याचे उघड झाले आहे. यावर उपाय म्हणून राज्यात कर्नाटक-गुजरातचा पॅटर्नचा वापरून १०,००० वोल्वो बस सुरू करणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली.
एसटीच्या श्वेतपत्रिकेनुसार, एसटी महामंडळाला २०१८-१९ मध्ये ४६०३ कोटी रुपये तोटा झाला होता. तो वाढून मार्च २०२३ च्या अखेरीस १०,३२४ कोटी रुपयांवर आला. तर २०२४-२५ मध्ये १२१७ कोटी रूपयांचा तोटा अपेक्षित आहे. दरम्यान राज्य सरकारने २००१ पासून ६३५३ कोटी रुपयांची भांडवली तर २०२० ते २०२३ या काळात ४७०८ कोटी रुपयांची महसुली मदत केली आहे. तसेच वैधानिक स्वरूपाची ३२९७ कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. तोट्याच्या कारणामध्ये बस कमी असणे, अनियमित भाडेवाढ, खाजगी वाहतूक यांचा समावेश आहे.
सरनाईक म्हणाले की, दरवर्षी पाच हजार बस एसटी महामंडळाच्या ताब्यात आल्या तर आपल्याला उत्पन्न वाढवता येईल असा प्रस्ताव मी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे मांडला होता. त्याला मंजुरी दिली आहे. हे काही अवघड काम नाही. सामान्यांचा एसटीवर विश्वास आहे. लालपरीवर प्रेम आहे. एसटी महामंडळाची सद्याची वस्तुस्थिती तुमच्यासमोर मांडली आहे. आमच्या कार्यकाळात कोणत्याही एसटी बस भाडेतत्वावर घेणार नाही. त्याचा फायदा फक्त ठेकेदारांना होतो. आम्ही चालक आणि वाहक भाडेतत्त्वावर घेऊन महामंडळाला पुढे नेण्यास प्रयत्न करु. कर्नाटकमध्ये फक्त १०,००० बस आहेत. त्या स्वच्छ आणि टापटीप आहेत. तो पॅटर्नसुद्धा आपण राज्यात राबवू. त्याचबरोबर पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अशी सहा प्रादेशिक कार्यालयेही करणार आहोत. गुजरातप्रमाणे आपण राज्यातील डेपो विकसित करणार आहोत. यामध्ये शहरी भागासह ग्रामीण भागातील डेपोही विकसीत झाले पाहिजेत या उद्देशाने राज्यातील २०० च्या आसपास डेपो विकसितत करत आहोत, त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे