‘मेक इन इंडिया’ला मोठा बूस्ट: कळवा ट्रान्सफॉर्मर युनिटमध्ये ‘ही’ कंपनी करणार 460 कोटींची गुंतवणूक

Siemens Energy India

Siemens Energy India | सीमन्स लिमिटेडची ऊर्जा शाखा, सीमन्स एनर्जी इंडिया लिमिटेड (SEIL) चे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर यशस्वीरित्या सूचीबद्ध झाले आहेत. यासोबतच, कंपनीने कळवा येथील ट्रान्सफॉर्मर युनिटमध्ये मोठी गुंतवणूक करणार असल्याची माहिती दिली आहे. भारताच्या वाढत्या ऊर्जा क्षेत्रासाठी हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.

SEIL मध्ये सीमन्स एजी आणि त्यांच्या उपकंपन्यांचा 69 टक्के हिस्सा आहे, तर सीमन्स एनर्जी एजीच्या उपकंपन्यांकडे 6 टक्के भागीदारी आहे. उर्वरित शेअर्स सार्वजनिकरीत्या उपलब्ध आहेत. कंपनीत सध्या 4,200 हून अधिक कर्मचारी कार्यरत असून, भारतात दहा उत्पादन युनिट्स आणि अकरा प्रादेशिक कार्यालये आहेत. भारताबरोबरच नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीव येथेही SEIL ऊर्जा सेवा पुरवते.

ऊर्जा क्षेत्रातील योगदान

SEIL ने वडोदरा येथील कारखान्यात 1,700 वी स्टीम टर्बाइन तयार केली आहे. तसेच, व्होल्टेज-सोर्स्ड कन्व्हर्टर (VSC) तंत्रज्ञानाद्वारे भारतातील पहिली उच्च-व्होल्टेज डायरेक्ट करंट (HVDC) ट्रान्समिशन लिंक उभारण्यात कंपनीने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला पाठिंबा देत, SEIL ने कळवा येथील ट्रान्सफॉर्मर युनिटमध्ये 460 कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली आहे. ऊर्जा तंत्रज्ञानातील नावीन्याला चालना देण्यासाठी कंपनीने एक कॉम्पिटन्सी हब स्थापन केले आहे, जे भारताला जागतिक ऊर्जा नवोपक्रमात आघाडीवर ठेवण्यास मदत करेल.

दरम्यान, SEIL ने आर्थिक वर्ष 2025 मध्ये महाविद्यालयातून निवडलेल्या कर्मचाऱ्यांपैकी 55 टक्क्यांहून अधिक महिला होत्या. कंपनीने औरंगाबाद येथे पहिली महिलांद्वारे संपूर्ण उत्पादन प्रक्रिया आणि कळवा येथील ट्रान्सफॉर्मर युनिटमध्ये पहिली महिला टीम सुरू केली आहे.