B-2 Stealth Bomber jets | इस्रायल आणि इराण यांच्यात युद्धबंदीचा करार झाला असला तरी, अमेरिकेच्या बी-2 स्टेल्थ बॉम्बर विमानांनी (B-2 stealth bomber jets) इराणच्या तीन अणुऊर्जा समृद्धी स्थळांवर केलेल्या हल्ल्याचे महत्त्व नाकारता येत नाही.
हे विनाशकारी बॉम्बर 30,000 पौंडांचे बॉम्ब टाकण्यास सक्षम आहेत. जगाचे लक्ष या शक्तिशाली लढाऊ विमानांकडे लागलेले असताना, या बी-2 स्टेल्थ बॉम्बरचे भारताशी असलेले एक महत्त्वपूर्ण आणि गूढ कनेक्शन आता समोर आले आहे. बी-2 स्टेल्थ बॉम्बरच्या निर्मितीमध्ये मुंबईत जन्मलेल्या नोशिर गोवाडिया यांची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, याच नोशिर यांना नंतर जेल देखील झाली होती.
1944 मध्ये मुंबईच्या पारशी कुटुंबात जन्मलेले नोशिर गोवाडिया लहानपणापासून हुशार होते. वयाच्या 15 व्या वर्षी पीएचडी पूर्ण केल्याचा दावा केला जातो. 19 व्या वर्षी एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिकण्यासाठी ते अमेरिकेत गेले आणि 1969 मध्ये त्यांना अमेरिकन नागरिकत्व मिळाले. 1970 मध्ये ते नॉर्थ्रॉप कॉर्पोरेशन (आता नॉर्थ्रॉप ग्रुमन) मध्ये रुजू झाले.
व्हिएतनाम आणि योम किप्पुर युद्धांमध्ये अमेरिकेच्या लढाऊ विमानांची कमजोरी समोर आली होती, ती दूर करण्यासाठी अमेरिका प्रयत्न करत असतानाच नोजिर गोवाडिया नॉर्थ्रॉपमध्ये रुजू झाले.
त्यांची कौशल्ये अत्यंत उपयुक्त ठरली, कारण अमेरिकेने हजारो विमाने गमावली होती आणि त्यांना अशा विमानांची गरज होती, जी शत्रूला दिसू शकणार नाहीत. गोवाडिया यांनी हे आव्हान स्वीकारले. त्यांनी बी-2 स्टेल्थ बॉम्बर्सची (B-2 stealth bombers) रचना केली. सुमारे दोन दशके त्यांनी या विमानाची प्रोपल्शन सिस्टिम तयार करण्यासाठी खर्च केली, जेणेकरून त्यातून बाहेर पडणारा धूर किंवा उष्णता हीट सेन्सर्स आणि रडारलाही दिसणार नाही.
बी-2 ची ताकद
बी-2 स्टेल्थ बॉम्बर 40,000 पौंड स्फोटके टाकण्यास आणि 10,000 नॉटिकल मैल उड्डाण करण्यास सक्षम आहे. गोवाडियांच्या डिझाइनमुळे हे विमान शत्रूंना दिसत नाही. इराणवरील हल्ल्यांमध्ये याच विमानाने 30,000 पौंडांचे बॉम्ब टाकले, ज्याने जगाचे लक्ष वेधले.
चीनसाठी हेरगिरी
गोवाडियांच्या कामाची प्रशंसा झाली, पण 1986 मध्ये रक्तविकारामुळे त्यांना नॉर्थ्रॉपमधून काढून टाकण्यात आले. याचवेळी त्यांनी हवाईच्या माउई येथे कर्जावर आलिशान व्हिला खरेदी केला. कर्जाच्या हप्त्यांसाठी पैशांची गरज भासल्याने, 2003 मध्ये त्यांनी चिनी अधिकाऱ्यांशी गुप्त भागीदारी सुरू केली. सहा वेळा चीनला भेट देऊन त्यांनी स्टेल्थ क्रूझ मिसाईलसाठी तंत्रज्ञान पुरवले. याबदल्यात त्यांना $110,000 मिळाले, ज्याने त्यांचे कर्ज फेडले.
2005 मध्ये महसूल अधिकाऱ्यांना गोवाडियांच्या मोठ्या रकमेबाबत संशय आला. एफबीआयच्या तपासात त्यांच्या हवाईतील घरातून संगणक, ब्लूप्रिंट्स आणि संवेदनशील डेटासह अनेक पुरावे सापडले. 2010 मध्ये चार महिन्यांच्या खटल्यानंतर त्यांना 32 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. आजही ते तुरुंगात आहेत. गोवाडियांच्या तंत्रज्ञानामुळे चीनला स्टेल्थ तंत्रज्ञानात आघाडी मिळाली.