Zohran Mamdani | अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदाच्या डेमोक्रॅटिक प्राथमिक निवडणुकीत भारतीय वंशाचे 33 वर्षीय मुस्लिम नेते झोहरान ममदानी (Zohran Mamdani) यांनी माजी गव्हर्नर अँड्र्यू कुओमो यांचा पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. आतापर्यंतच्या निकालानुसार, ममदानींना 43.5 टक्के मते मिळाली, तर कुओमो 36.3 टक्के मतांसह मागे पडले. हा विजय न्यू यॉर्कच्या राजकारणात तरुण आणि प्रगतिशील नेतृत्वाचा उदय दर्शवतो.
झोहरान ममदानी हे प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या मीरा नायर आणि युगांडाचे मार्क्सवादी विद्वान महंमूद ममदानी यांचे सुपुत्र आहेत. ‘एक्स’वर त्यांनी समर्थकांचे आभार मानत नेल्सन मंडेलांचे शब्द उद्धृत केले, “जोपर्यंत एखादी गोष्ट पूर्ण होत नाही, तोपर्यंत ती अशक्य वाटते. तुम्हीच हे शक्य केले. न्यू यॉर्कच्या महापौरपदाचा डेमोक्रॅटिक उमेदवार होण्याचा मला सन्मान वाटतो.”
न्यू यॉर्कच्या राजकारणात बदल
न्यू यॉर्क शहरात डेमोक्रॅट्सची संख्या रिपब्लिकनपेक्षा तिप्पट आहे, त्यामुळे प्राथमिक निवडणुकीतील विजय महापौरपदासाठी निर्णायक मानला जातो. मतदारांनी उत्साहाने मतदान केले. ममदानींची सोशल मीडियावर आधारित मोहीम आणि परवडणारी घरे, सार्वजनिक वाहतूक सुधारण्याची आश्वासने मतदारांना भावली. गेल्या वर्षीच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांच्या विजयामुळे डेमोक्रॅट्समधील अस्वस्थता ममदानींच्या विजयाने काहीशी कमी झाली आहे.
झोहरान ममदानी यांचा प्रवास
युगांडात जन्मलेले ममदानी 25 वर्षांपूर्वी अमेरिकेत आले. ते लहानपणी मीरा नायर यांच्या चित्रपटांच्या सेटवर वेळ घालवायचे. ‘यंग कार्दमम’ नावाने संगीत क्षेत्रातही काम केले. 2018 मध्ये अमेरिकन नागरिकत्व मिळाल्यानंतर 2020 मध्ये त्यांनी विजय मिळवत न्यू यॉर्क स्टेट असेंब्लीत प्रवेश केला. गृहहक्क, सार्वजनिक वाहतूक आणि आर्थिक समानतेवर त्यांचे प्रगतिशील विचार प्रसिद्ध आहेत.
ममदानी यांनीसीरियन वंशाच्या चित्रकार रमा दुवाजी यांच्याशी लग्न केले आहे. गेल्या डिसेंबरमध्ये दुबईत त्यांचा विवाह झाला. फोर्ब्सनुसार, त्यांची संपत्ती 1.6 ते 2.5 कोटी रुपये आहे. महापौर म्हणून त्यांना वार्षिक 2.16 कोटी रुपये पगार मिळेल. आता नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मुख्य निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाकडून ममदानी महापौरपदाचे उमेदवार असतील. ममदानी निवडून आल्यास ते न्यू यॉर्क सिटीचे पहिले मुस्लिम आणि भारतीय अमेरिकन महापौर ठरतील.