Sholay Movie | भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक असलेला ‘शोले’ (Sholay) पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर जादू करण्यासाठी सज्ज झाला आहे. इटलीमधील बोलोग्ना (Italy) शहरात आयोजित प्रतिष्ठित ‘इल सिनेमा रिट्रोवाटो फेस्टिव्हल’ (Il Cinema Ritrovato Festival) मध्ये या चित्रपटाची पूर्णपणे रिस्टोर्ड केलेली आणि ‘अनकट’ आवृत्ती प्रदर्शित होणार आहे.
‘शोले’च्या 50व्या वर्धापनदिनानिमित्त 27 जून 2025 रोजी पिआझा मॅगिओर येथील खुल्या मैदानावर याचे खास स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले आहे. या आवृत्तीत चित्रपटाचा मूळ क्लायमॅक्स आणि काही डिलीट केलेले सीन प्रथमच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत
फिल्म हेरिटेज फाउंडेशन आणि सिप्पी फिल्म्स यांनी एकत्र येऊन 1975 मधील या क्लासिक चित्रपटाची ‘डायरेक्टर’ कट’ आवृत्ती सादर करण्यासाठी विशेष मेहनत घेतली आहे.
‘शोले’मधील ‘जय’ची आयकॉनिक भूमिका साकारणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, “आयुष्यात काही गोष्टी कायमच्या लक्षात राहतात, आणि ‘शोले’ त्यापैकी एक आहे. शूटिंगदरम्यान आम्हाला याची कल्पनाही नव्हती की हा चित्रपट भारतीय सिनेमाचा इतिहास बदलून टाकेल.
1975 मध्ये प्रदर्शित झालेला ‘शोले’ हा चित्रपट भारतीय सिनेमातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक मानला जातो. जय (अमिताभ बच्चन), वीरू (धर्मेंद्र), ठाकूर (संजीव कुमार), बसंती (हेमा मालिनी), राधा (जया बच्चन) आणि हिंदी सिनेमातील सर्वात प्रतिष्ठित खलनायक गब्बर सिंग (अमजद खान) यांच्या पात्रांमुळे हा चित्रपट भारतीय पॉप कल्चरचा अविभाज्य भाग बनला आहे.
सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या प्रभावी पटकथेने आणि रमेश सिप्पी यांच्या दिग्दर्शनाने या चित्रपटाला खास बनवले. 50 वर्षानंतर हा चित्रपट मूळ शेवटसह मोठ्या पडद्यावर पाहता येईल. चित्रपटाच्या या रिस्टोरेशनसाठी 3 वर्ष लागली.