उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेकरूंचीबस नदीत कोसळली; दोघांचा मृत्यू

Chardham pilgrims' bus falls into river in Uttarakhand

देहराडून – उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग (Rudraprayag Accident) जिल्ह्यातील घोलथीर येथे आज सकाळी एक भीषण अपघात झाला. बद्रीनाथकडे जाणारी चारधाम यात्रेकरुंची टेम्पो ट्रॅव्हलर बस (Tempo Traveler Bus) ३०० मीटर खोल दरीत कोसळून थेट अलकनंदा नदीत बुडाली. या दुर्घटनेत २ प्रवाशांचा मृत्यू झाला असून, ८ जण गंभीर जखमी आहेत, तर १० प्रवासी अद्याप बेपत्ता आहेत. मुसळधार पावसामुळे नदीला पूर आल्याने बचाव कार्यात अडथळा येत आहे.

बस मध्यप्रदेशातील राजगड आणि गुजरातमधील सुरत येथून आलेल्या सोनी कुटुंबीयांची होती. या बसमध्ये एकूण २० जण प्रवास करत होते. अपघातावेळी काही प्रवाशांनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. त्यांना तत्काळ दरीतून बाहेर काढून रुद्रप्रयाग आणि ऋषिकेश येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. या दुर्घटनेत विशाल सोनी (४२, मध्यप्रदेश) आणि द्रिमी सोनी (१७, गुजरात) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर दीपिका, हेमलता, ईश्वर, भावना, अमिता, भव्य, पार्थ आणि चालक सुमित कुमार हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर १० जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये रवी भावसार, मौली, ललित, गौरी, संजय, मयुरी, चेतना, चेत्ता, कट्टा रंजना अशोक आणि सुशीला सोनी यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, एसडीआरएफ, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक नागरिकांनीही या कार्यात मोठी मदत केली. मात्र, अलकनंदा नदीचा प्रवाह अत्यंत वेगवान असल्यामुळे शोधमोहीमेला अडथळे येत आहेत. बस अपघातामधील अनेक जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. त्याचप्रमाणे अनेक जण वाहून गेल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.