ICC New Cricket Rules | आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅट्ससाठी नवे नियम मंजूर केले आहेत. हे नवीन नियम 2 जुलै 2025 पासून लागू होणार आहेत. कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेट, लाळेचा वापर आणि डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम (DRS) यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष केंद्रित करणारे हे बदल खेळाला अधिक गतिमान आणि पारदर्शी बनवणार आहेत.
विशेषतः वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) 2025-27 सायकलसाठी काही नियम आधीच लागू झाले असून, व्हाईट-बॉल क्रिकेटसाठी नवे नियम 2 जुलैपासून लागू होतील.
कसोटी क्रिकेटमध्ये ‘स्टॉप क्लॉक’ नियम
कसोटी क्रिकेटमधील स्लो ओव्हर रेटच्या समस्येवर उपाय म्हणून ICC ने ‘स्टॉप क्लॉक’ नियम लागू केला आहे. हा नियम आधी व्हाईट-बॉल क्रिकेटमध्ये यशस्वी ठरला होता. आता कसोटी सामन्यांमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला एक ओव्हर संपल्यानंतर 60 सेकंदांच्या आत पुढील ओव्हर सुरू करण्याची तयारी दर्शवावी लागेल.
नियमाचे पालन न केल्यास पंच दोनदा वॉर्निंग देतील. त्यानंतरही उल्लंघन झाल्यास गोलंदाजी करणाऱ्या संघाला 5 धावांची पेनल्टी लागेल. प्रत्येक 80 ओव्हर्सनंतर वॉर्निंग शून्य होईल. हा नियम WTC 2025-27 सायकलमध्ये आधीच लागू झाला आहे.
लाळेचा वापर आणि चेंडू बदलण्याचा नियम
चेंडूवर लाळ लावण्यावरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. तथापि, आता प्रत्येक वेळी लाळेचा वापर झाल्यासअंपायरला चेंडू बदलणे बंधनकारक राहणार नाही. चेंडूची स्थिती लक्षणीयरीत्या बदलली असेल (उदा. तो खूप ओला झाला असेल) तरच अंपायर चेंडू बदलतील. हा निर्णय पूर्णपणे अंपायरच्या हातात असेल, ज्यामुळे संघांना जाणीवपूर्वक लाळेचा वापर करून चेंडू बदलण्याचा प्रयत्न करता येणार नाही.
DRS मध्ये सुधारणा
डिसीजन रिव्ह्यू सिस्टीम (DRS) मध्येही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता ‘कंबाइन रिव्ह्यू’ घेताना घटनांच्या कालानुक्रमानुसार निर्णय घेतला जाईल. उदाहरणार्थ, कॅच आणि लेग बिफोर (LBW) च्या एकाच वेळी अपील झाल्यास, टीव्ही अंपायर प्रथम LBW ची तपासणी करेल, कारण ती आधी घडली.
याशिवाय, जर बॅट्समनला कॅच आउट दिले गेले आणि रिव्ह्यूमध्ये चेंडू बॅटला लागला नसल्याचे दिसले, तर लगेचच बॉल-ट्रॅकिंगद्वारे LBW तपासले जाईल. जर बॉल-ट्रॅकिंगमध्ये ‘अंपायर्स कॉल’ आले, तर मूळ आउटचा निर्णय कायम राहील. या बदलामुळे DRS अधिक अचूक आणि निष्पक्ष होईल.
इतर महत्त्वाचे बदल
नो-बॉल आणि कॅच: जर अंपायरला कॅच योग्य आहे की नाही याबाबत शंका असेल आणि त्याच वेळी नो-बॉल असेल, तर थर्ड अंपायर कॅचचीही तपासणी करेल. कॅच योग्य असल्यास फलंदाजी करणाऱ्या संघाला फक्त नो-बॉलची एक धाव मिळेल.
जाणूनबुजून शॉर्ट रन: फलंदाजाने मुद्दाम शॉर्ट रन घेतल्यास क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला 5 धावांची पेनल्टी आणि स्ट्राइकवर कोणता फलंदाज ठेवायचा याचा निर्णय घेण्याचा पर्याय मिळेल.
घरेलू क्रिकेटमध्ये बदली खेळाडू: गंभीर दुखापतीच्या बाबतीत आता ICC ने सदस्य देशांना ‘फूल-टाईम रिप्लेसमेंट’ खेळाडू आणण्याची परवानगी दिली आहे.