Shefali Jariwala | ‘कांटा लगा’ फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shefali Jariwala | 'कांटा लगा' फेम अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Shefali Jariwala | कांटा लगा’ या आयकॉनिक म्युझिक व्हिडिओमुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री शेफाली जरीवालाचे वयाच्या 42व्या वर्षी अकस्मात निधन झाले आहे. शुक्रवारी (27 जून) रात्री उशिरा त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला असून, फॉरेन्सिक पथकानेही त्यांच्या अंधेरीतील घराची पाहणी केली आहे. या घटनेने चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

शेफालीचे पती, अभिनेते पराग त्यागी यांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रात्री 12:30 च्या सुमारास त्यांचे पार्थिव कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. कूपर रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतदेह दुसऱ्या रुग्णालयातून आणला गेला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

पोलिसांचा तपास

मुंबई पोलीस रात्री उशिरा शेफाली यांच्या अंधेरीतील घरी पोहोचले आणि तपास सुरू केला. फॉरेन्सिक पथकाने घराची तपासणी केली. पोलिसांनी सांगितले, “रात्री 1 वाजता आम्हाला माहिती मिळाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवला आहे. मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.” फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीमुळे हे प्रकरण संशयास्पद मानले जात आहे. शेफालीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेफाली यांची कारकीर्द

2002 मध्ये ‘काटा लगा’ म्युझिक व्हिडिओमुळे शेफाली घराघरात पोहोचली आणि ‘काटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध झाली. तिने सलमान खानच्या ‘मुझसे शादी करोगी’ चित्रपटात आणि ‘बेबी कम ना’ वेब सिरीजमध्ये काम केले. ‘बुगी वूगी’ आणि ‘नच बलिये’ या डान्स रिॲलिटी शोमधूनही त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. ती रिअॅलिटी शो ‘बिग बॉस 13’ मध्येही दिसली होती.