Bhopal 90 Degree Bridge | मध्य प्रदेशच्या भोपाळमधील ऐशबाग परिसरात बांधलेला एक पूल (Bhopal 90 Degree Bridge) सर्वत्र चर्चेचा विषय ठरला होता. रेल्वे ओव्हर पूलाच्या (ROB) विचित्र 90 अंशांच्या वळणामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. यामुळे मध्य प्रदेश सरकारवर टीका देखील झाली होती. आता अखेर या प्रकरणी सरकारने कारवाई केली आहे.
या पुलाला चक्क 90 अंशांचा एक विचित्र वळण असल्यामुळे त्याचे डिझाइन वादात सापडले आहे. या गंभीर चुकीसाठी सरकारने दोन मुख्य अभियंत्यांसह 8 अभियंत्यांना निलंबित केले आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री मोहन यादव (Chief Minister Mohan Yadav) यांनी ‘एक्स’ ( ट्विटर) वर माहिती दिली. “ऐशबाग ROB च्या बांधकामात झालेल्या गंभीर निष्काळजीपणाची मी दखल घेतली आणि चौकशीचे आदेश दिले. चौकशी अहवालाच्या आधारावर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आठ अभियंत्यांवर कारवाई करण्यात आली आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय, पुलाचे बांधकाम करणारी एजन्सी आणि डिझाइन सल्लागाराला काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. सुधारणा समिती स्थापन करून डिझाइन दुरुस्त केल्यानंतरच पुलाचे उद्घाटन होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या पुलाच्या 90 अंशांच्या वळणामुळे वाहनचालकांना अडचणी येण्याची शक्यता आहे, ज्यामुळे स्थानिक आणि सोशल मीडियावर टीका करण्यात आली होती. ही चूक सरकारी कामांमधील निष्काळजीपणाचे उदाहरण मानली जात आहे. आता प्रशासनाने तातडीने कारवाई करत पुलामध्ये बदल करणार असल्याची माहिती दिली आहे.