उबाठा-मनसेचा विजयी मेळावा शिवतीर्थाऐवजी वरळी डोममध्ये

Sanjay Raut criticises mahayuti government


मुंबई – शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीची (Hindi) सक्ती करण्याबाबतचे दोन्ही अध्यादेश सरकारने मागे घेतल्यानंतर शिवसेना ठाकरे गट (UBT)आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) एकत्रित विजयी मेळावा शिवतीर्थाऐवजी वरळीतील एनएससीआय डोममध्ये घेण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (MP Sanjay Raut)यांनी आज दिली.
हिंदी सक्तीवरून राज्यातील मराठी माणसांमध्ये पसरलेला रोष आणि शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने माघार घेतल्यानंतर ५ जुलै रोजी शिवाजी पार्कवर विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे, असे राऊत यांनी सांगितले.
माझी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे या दोघांशी चर्चा झाली आहे.हे दोन्ही बंधू ५ जुलै रोजीच्या विजयी मेळाव्यात एकत्र येणार आहेत. आम्ही आधी शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडे परवानगीसाठी अर्ज केला आहे. मात्र हे सरकार आम्हाला शिवाजी पार्क मैदानावर मेळावा घेण्याची परवानगी देईल असे वाटत नाही. त्यामुळे राज ठाकरे यांनी वरळी डोमचा पर्याय सुचवला. त्याला सर्वांनी सहमती दर्शवली आहे, असे राऊत यांनी सांगितले.